महिंद्राच्या काही कारनी क्रॅश टेस्टमध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळविली आहे. यामुळे महिंद्रा ही कंपनी देशातील दुसरी भारतीय कंपनी बनली आहे. अशातच महिंद्राच्या बोलेरो निओ या एसयुव्हीने मात्र निराश केले आहे. भारत एनकॅप सुरु झालेले असले तरी ग्लोबल एनकॅपमध्ये कंपन्या आपल्या कार पाठवत आहेत. या GNCAP चे निकाल आले आहेत.
या रिझल्टनुसार Bolero NEO ने खराब प्रदर्शन केले आहे. चाईल्ड आणि अडल्ट सेफ्टीमध्ये महिंद्राच्या बोलेरो निओला १ स्टार मिळाला आहे. चाचणीला गेलेल्य़ा मॉडेलमध्ये दोन एअरबॅग देण्यात आल्या होत्या. या कारने फ्रंट, स्ट्रक्चर, पाय ठेवण्याचा भाग आणि छातीचा भाग आदी ठिकाणी अत्यंत खराब प्रदर्शन केले आहे. या भागात आतील डमी पॅसेंजरला जास्त मार बसला आहे.
बोलेरो NEO ने प्रौढ संरक्षणासाठी कमाल 34 पैकी 20.26 गुण मिळवले. तर लहान मुलांच्या संरक्षणात ४९ पैकी १२.७१ गुण मिळाले आहेत. यामुळे या एसयुव्हीला एक स्टार देण्यात आला आहे.
सर्व प्रवाशांसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट, प्रवाशांसाठी साइड एअरबॅग, मागील प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर आणि बरेच काही यासारख्या वैशिष्ट्यांच्या अभावामुळे बोलेरो निओला इतर SUV च्या तुलनेत धक्कादायक रेटिंग मिळाले आहे. सध्या भारतीय ग्राहकांचा कल सुरक्षित कार घेण्याकडे वळलेला आहे. याचा फायदा टाटाला होताना दिसत आहे. भारतात फोक्सवॅगन, टाटा, महिंद्रा, स्कोडा आणि ह्युंदाईची एक कार अशा हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्याच कंपन्यांच्या कारना फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेले आहे.