ऑटोमोबाईल, उर्जा क्षेत्रातील पुण्यातील मल्टीनॅशनल कंपनी भारत फोर्जची मुख्य हिस्सेदारी असलेली कंपनी टॉर्क (Tork) इलेक्ट्रीक मोटरसायकल भारतीय बाजारात आणणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ही मोटरसाय़कल (electric two-wheeler) लाँच होण्याची शक्यता आहे. Tork T6X या इलेक्ट्रीक मोटरसायकलला काही दिवसांपूर्वीच टेस्टिंग करताना पाहिले गेले आहे.
Tork T6X हे कॉन्सेप्ट नाव असून ही मोटरसायकल टॉर्क क्रॅटोस (Tork Kratos) नावाने येणार आहे. कंपनीने याबाबत ट्विट केले आहे. लाँचनंतर काही महिन्यांतच या इलेक्ट्रीक बाईकची डिलिव्हरी सुरु केली जाणार आहे. टॉर्क मोटर्स या बाईकवर काही वर्षांपासून काम करत होती. यामुळे ही बाईक खास असेल की अन्य स्टार्टअप कंपन्यांसारखीच असेल याबाबत आताच काही सांगता येणार नाही. परंतू ही बाईक Revolt RV400 ला टक्कर देणार आहे.
सुरुवातीच्या प्रोटोटाइपच्या तुलनेत बाइकमध्ये बरेच बदल करण्यात आल्याचे टॉर्कचे म्हणणे आहे. ही बाईक कंपनीच्या विकसित LIION बॅटरी पॅकसह येईल, जी अधिक शक्ती आणि अधिक श्रेणीसाठी डिझाइन केलेली आहे. याशिवाय, Kratos इलेक्ट्रिक मोटरसायकल फास्ट चार्जिंग, डेटा सेवा आणि 4G टेलीमेट्री यांसारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल.
तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, या इलेक्ट्रिक बाइकमध्ये सिग्नेचर TIROS (टॉर्क इन्ट्युटिव्ह रिस्पॉन्स ऑपरेटिंग सिस्टीम) समाविष्ट आहे, जी शहरी प्रवाशांना उत्तम सवारीचा अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. याशिवाय टॉर्क क्रॅटोसमध्ये पॉवर मॅनेजमेंट, टेक्निकल अॅनालिसिस, रिअल टाइम पॉवर कंझम्पशन, रेंज फोरकास्ट इत्यादी प्रगत वैशिष्ट्ये देखील समाविष्ट आहेत.