काही वर्षांपूर्वी फोक्सवॅगन कंपनीने इंधन जाळल्यानंतर बाहेर पडणाऱ्या धुरामधील घटक कमी दाखविण्यासाठी घोटाळा केला होता. तसाच प्रकार जगातील सर्वात मोठी कंपनी टोयोटाने केल्याचे समोर आले आहे. यामध्ये फॉर्च्युनर, इनोव्हा क्रिस्टा, हायलक्स सारख्या एसयुव्हींच्या डिझेल इंजिनाचा समावेश आहे. या प्रकरणी जपान कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
महत्वाचे म्हणजे या एसयुव्ही भारतात देखील तुफान विकल्या जातात. अनेक ऑटोमोबाईल आणि फोर्कलिफ्ट इंजिन मॉडेल्सच्या कामगिरी चाचणी डेटामध्ये छेडछाड केल्याचे कंपनीने मान्य केले आहे. या प्रभावित इंजिनांमुळे कंपनीले मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते. तसेच या इंजिनांची नोंदणीदेखील रद्द होण्याची शक्यता आहे.
हा गैरव्यवहार गंभीर असल्याचे जपानच्या वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच भविष्यातील असे प्रकार रोखण्य़ासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर टोयोटाने 10 वेगवेगळ्या वाहनांच्या मॉडेल्सची शिपमेंट थांबवली होती. फोर्कलिफ्टमधील समस्या लक्षात आल्यानंतर ही समस्या अंतर्गत रित्या मॅनेज केली गेली. अशा प्रकारची जवळपास ८४ हजार वाहने विकण्यात आली आहेत.
भारतात देखील कंपनीने फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा या कारची विक्री सुरु केली आहे. तसेच या कारचे डिझेल इंजिन भारतीय नियमांचे पालन करत असल्याचेही म्हटले आहे.