एक, दोनच कारच्या जिवावर भारतीय बाजारात तग धरून असलेल्या टोयोटा कंपनीने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. होंडा सिटीला टक्कर देण्यासाठी लाँच केलेली प्रमिअम सेदान कार कंपनीने कायमची बंद केली आहे. खप नसल्याने कंपनीने Toyota Yaris चे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (Toyota Yaris discontinued in India)
काही वर्षांपूर्वीच कंपनीने Toyota Yaris ही प्रमिअम सेदान कार लाँच केली होती. कंपनीच्या इनोव्हा आणि फॉर्च्युनर या दोनच कारचा सेल सुरु आहे. बाकीच्या कारना मागणी नसल्यासारखीच आहे. यामुळे टोयोटानेमारुतीसोबत हातमिळवणी करत मारुतीची बलेनो रिबॅज करून विकण्यास सुरुवात केली. परंतू मारुती नेक्साच्या जेवढ्या बलेनो विकल्या जातात त्याच्या १० टक्केही कार टोयोटाच्या विकल्या जात नाहीएत.
विक्री होत नसल्याने फोर्ड कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारत सोडला आहे. त्या आधी जनरल मोटर्सने भारत सोडला होता. विक्री होत नसल्याने आता टोयोटाने यारिसचे उत्पादन थांबवून मारुतीची सियाज रिबॅज करून विकण्याचा निर्णय घेतला आहे. टोयोटा किर्लोस्कर मिळून भारतात कंपनी चालवितात. या कंपनीने २७ सप्टेंबरपासून ही कार बंद करण्याचे जाहीर केले आहे. पुढील १० वर्षे कंपनी यारिसच्या ग्राहकांना स्पेअर पार्ट, सर्व्हिस पुरविणार आहे.
गेल्या तीन वर्षांत कंपनीने Toyota Yaris ची 19,784 युनिट विकली आहेत. तीन वर्षांतच कंपनीने उत्पादन बंद केल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. आता टोयोटा मारुतीची सियाझ बेल्टा या नावाने विकण्याची शक्यता आहे. सियाझ यारिसची जागा घेणार आहे. टोयोटा सध्या मारुतीच्या दोन गाड्या ग्लँझा आणि ब्रेझाची बॅजिंग कार अर्बन क्रूझर विकत आहे. इनोव्हामुळे टोयोटा भारतीय बाजारत टिकून आहे.