नवी दिल्ली : टोयोटा भारतीय बाजारपेठेत एक नवीन कार लाँच करणार आहे. यासंबंधीचा अधिकृत टीझर आला आहे. या कारचे नाव टोयोटा अर्बन क्रूजर टेजर (Toyota Urban Cruiser Taisor) असणार आहे. तर 3 एप्रिलला लाँच होईल. ही नवीन कार मारुती Fronx चे रिब्रँडेड व्हर्जन असणार आहे. टोयोटा टेजरला बाह्य आणि केबिन डिझाइनमध्ये काही कॉस्मेटिक अपडेट्स मिळतील. तसेच, इंजिन ऑप्शन्स देखील Fronx सारखे असतील.
टोयोटा अर्बन क्रूजर टेजरचे फ्रंट ग्रिल थोडे नवीन स्टाईलमध्ये असणार आहे. यामध्ये मारुतीच्या लोगोच्या जागी टोयोटाचा लोगो दिसेल. एसयूव्हीची बाजू आणि मागील प्रोफाइल मारुती सुझुकी स्विफ्ट सारखीच असण्याची अपेक्षा आहे. टेजरसाठी अधिकृत बुकिंग देखील कारच्या लाँचसह म्हणजेच 3 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कारमध्ये ट्राय-एलईडी लाइट्स उपलब्ध असतील. याशिवाय एसयूव्हीमध्ये एलईडी स्ट्रिप्सही मिळू शकतात. ही कार अलॉय व्हील्ससह येईल.
इंटीरियरबद्दल सांगायचे झाल्यास टेजरची बहुतेक फीचर्स Fronx सारखीच असतील. कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, हेड्स अप डिस्प्ले, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सारखी फीचर्स असतील. सुरक्षेबद्दल बोलायचे झाल्यास, कारच्या बेस मॉडेलमध्ये अँटी ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि सीट-बेल्ट वॉर्निंग यांसारख्या फीचर्स दिले जातील. तसेच, कारच्या सीट Fronx च्या सीटपेक्षा थोड्या वेगळ्या असतील.
इंजिनबद्दल बोलायचे झाले तर टोयोटा टाझरला मारुती Fronx प्रमाणेच पॉवरट्रेन मिळेल. म्हणजेच यात दोन इंजिन ऑप्शन्स असतील. पहिले म्हणजे 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आहे, जे 89bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे 1.0 लिटर टर्बोचार्ज केलेले इंजिन आहे, जे 99bhp पॉवर आणि 148Nm टॉर्क देते. दोन्ही इंजिन सँडर्ड म्हणून 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतात. याशिवाय 1.2 लीटर इंजिनसह 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 1.0 लीटर इंजिनसह 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला जाईल.
किंमत किती असेल?टोयोटाच्या रीब्रँडेड कार सामान्यतः मारुती कारपेक्षा महाग असतात. टोयोटा ग्लांजाची किंमत बलेनोपेक्षा जवळपास 20 हजार रुपये जास्त आहे. टेजरची किंमत Fronx पेक्षा 35 हजार रुपयांनी जास्त असण्याची शक्यता आहे. मारुती Fronx ची सुरुवातीची किंमत 7.51 लाख रुपये आहे. टेजरची सुरुवातीची किंमत जवळपास 7.85 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. तर या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 13.50 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. या सर्व किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत. लाँच झाल्यानंतर, मारुती सुझुकी व्यतिरिक्त, ही एसयूव्ही निसान मॅग्नाइट, रेनॉल्ट किगर, ह्युंदाई एक्ससेंट आणि टाटा पंच सारख्या कारला मार्केटमध्ये टक्कर देऊ शकेल.