Toyota ही जपान स्थित कार निर्माती कंपनी लवकरच बाजारात आपली पहिली वहिली इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. टोयोटाकडून लाँच केली जाणारी कंपनीची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार एक एसयूव्ही श्रेणीतील कार असणार आहे. तसंच बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या इतर इलेक्ट्रीक कारपेक्षा अधिक सुरक्षित कार बनवण्याचा टोयोटाचा मानस आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार टोयोटा कंपनी आपली पहिली इलेक्ट्रीक कार Toyota bZ4X या वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल करू शकते. इंधनाचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना सध्या इलेक्ट्रीक कारची मागणी वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रीक वाहनांची क्रेझ आता हळूहळू निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येक कार उत्पादन कंपनी आता इलेक्ट्रीक कार उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत करू लागली आहे.
इलेक्ट्रीक कारमध्ये बॅटरी जळण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर टोयोटाकडून बाजारात आणली जाणारी इलेक्ट्रीक कार सध्या उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रीक कारपेक्षा अधिक सुरक्षित असणार असल्याचा दावा केला जात आहे.
टोयोटा bZ4X मध्ये काय असतील स्पेसिफिकेशन्स...कंपनीच्या दाव्यानुसार नव्या टोयोटा bZ4X मध्ये पॅनासॉनिक कॉर्पोरेशन कंपनीनं बनवलेली बॅटरी वापरण्यात येणार आहे. या बॅटरीमध्ये एक वेगळ्यापद्धतीच्या कुलेंटचा वापर केला जातो. ज्यामुळे बॅटरीला आगीपासून संरक्षण मिळतं. तसंच बॅटरीमध्ये कोणत्याही पद्धतीचं लिकेज झालंच तर कुलेंटला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
१० वर्षांनंतरही बॅटरी चालणारसध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रीक कार चार्ज करण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यात फास्ट चार्जिंगचा पर्याय जरी वापरला गेला तरी बॅटरी गरम होण्याचा धोका असतो. तसंच बॅटरीची क्षमता देखील यामुळे कमी होते. बॅटरीची क्षमता कमी झाल्यास कारची रिसेल व्हॅल्यू देखील कमी होते.
टोयोटा याच सर्व अडचणींवर मात करत नवी कार डिझाइन करत आहे. कंपनीच्या दाव्यानुसार टोयोटाच्या इलेक्ट्रीक कारच्या बॅटरीची क्षमता १० वर्षांनंतरही ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहणारी आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार कंपनीची ही कार या वर्षात जून महिन्यात जपानमध्ये लाँच होईल. त्यानंतर इतर देशांमध्येही उपलब्ध होऊन जाईल. तसंच कंपनीकडून २०२५ पर्यंत एकूण ७ इलेक्ट्रीक कार लाँच केल्या जाणार आहेत.