जगातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टोयोटाने मारुतीच्या साह्याने भारतीय बाजारात आपली पावले भक्कम रोवण्यास सुरुवात केली आहे. छोट्या कारच्या क्षेत्रात टोयोटाला आजही पाय रोवता आलेले नाहीत. एसयुव्हींच्या क्षेत्रात कंपनीने बऱ्यापैकी दबदबा निर्माण केला आहे. असे असले तरी मारुतीच्या कार रिबॅज करून टोयोटा गाड्या आणत आहे. आता आणखी एक मारुतीची कार टोयोटाच्या शोरुममध्ये येत आहे.
मारुती सुझुकीची Maruti Suzuki Fronx ही कार टोयोटाच्या ताफ्यात टैसर या नावाने येणार आहे. येत्या ३ एप्रिलला कंपनी ही कार लाँच करणार आहे. कंपनीने नुकतेच Urban Cruiser Taisor या नावाने ट्रेडमार्क रजिस्टर केला आहे. ही कार tata Punch, Maruti Suzuki Fronx आणि Hyundai Exter ला टक्कर देणार आहे.
मारुतीची ही कार बलेनोवर आधारीत आहे. मारुतीने गेल्या वर्षी ही कार लाँच केली होती. तिचा लुक एसयुव्हीसारखा करण्यात आला आहे. आधीच्याच रिबॅज्ड कारप्रमाणे टोयोटा फ्राँक्सचाच लुक कायम ठेवणार आहे. फक्त ग्रिल, बंपर, लाईट्स आदीमध्ये बदल केले जाणार आहेत.
ही कार टोयोटाद्वारे मारुतीची चौथी रिबॅज केली जाणारी कार असणार आहे. यापूर्वी टोयोटाने मारुती ब्रेझाला पहिल्यांदा अर्बन क्रूझर एसयुव्ही म्हणून विकली होती. परंतु तिला यश आले नव्हते. अर्टिगाला रुमियन आणि बलेनोला ग्लँझा म्हणून टोयोटा विकत आहे. या गाड्यांमुळे टोयोटाची विक्री काही प्रमाणावर वाढली आहे.