चेन्नई स्थित व्होल्ट्रिक्स मोबिलिटीने ऑफिस कम्युटर सायकल 'ट्रेसर' लाँच करून ई-सायकल सेगमेंटमध्ये एन्ट्री घेतली आहे. कंपनी पुढील 6 महिन्यांत आणखी 2 प्रोडक्ट्स लाँच करण्याची देखील योजना आखत आहे. कंपनी याद्वारे या सेगमेंटमध्ये आपली पोहोच अधिक वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. 2024 पर्यंत 4-5 टक्के मार्केट शेअर मिळवण्याचा कंपनीचा मानस आहे.
कंपनीने 'ट्रेसर' ई-सायकल 55,999 रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीपासून लाँच केली आहे. या इलेक्ट्रीक सायकलमध्ये 250 वॉट क्षमतेची मोटर रिमुव्हेबल लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. फुल चार्जवर ही बॅटरी ६० ते ८० किमीपर्यंतची रेंज देते. याशिवाय या सायकलचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतका आहे.
'ट्रेसर' ई-सायकल 999 रुपयांत बुक करता येऊ शकते. त्याची डिलिव्हरी या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. "आपल्या देशाला एक निरोगी युवा देश बनवण्यासाठी इलेक्ट्रीक सायकलींची आवश्यकता आहे. व्होल्ट्रिक्स हा शहरात राहणाऱ्यांना सुरक्षित, आनंददायक, आणि आरोग्यदायी वाहतुकीसाठी नवा पर्याय बनेल," असा विश्वास व्होल्ट्रिक्स मोबिलिटीचे संस्थापक आणि सीईओ विवेक एम पलानिवासन यांनी व्यक्त केला. दरम्यान, पुढील दोन महिन्यांत निरनिराळ्या कस्टमर प्रोफाईलसाठी २ आणखी प्रोडक्ट्स लाँच केले जातील. याशिवाय ग्राहकांना सायकल खरेदी करण्यासाठी फायनॅन्स ऑप्शनसही दिले जात असल्याची माहिती कंपनीचे संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी शक्तीविघ्नेश्वर आर यांनी दिली.