नवी दिल्ली : टीव्हीएसची (TVS) नवीन इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करणाऱ्यांना धक्का बसला आहे. भारतीय दुचाकी कंपनीने लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस iQube च्या किमतीत वाढ केली आहे. अलीकडेच, भारत सरकारने फेम II सबसिडीमध्ये बदल केले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सरकार ही सबसिडी देते. आता सबसिडी कमी झाल्याने कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत वाढ केली आहे.
कंपनीने नवी दिल्लीसाठी किमती वाढवल्या आहेत. जर तुम्ही नवी दिल्लीत राहात असल्यास टीव्हीएस iQube ची किंमत 17,000 रुपये ते 22,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या व्हेरिएंटनुसार किंमती वाढवण्यात आल्या आहेत. 1 जूनपासून टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटरच्या वाढलेल्या किमती लागू केल्या जातील. एकूणच, फक्त दिल्लीसाठी किंमत वाढवण्यात आली आहे.
ज्या ग्राहकांनी 20 मे 2023 पर्यंत बुकिंग केले आहे, त्यांना iQube साठी 1,16,184 रुपये भरावे लागतील. तसेच, iQube S साठी 1,28,849 रुपये खर्च करावे लागतील. 21 मे पासून बुकिंग करणाऱ्यांना iQube साठी 1,23,184 रुपये आणि iQube S साठी 1,38,289 रुपये द्यावे लागतील. या सर्व दिल्लीतील ऑन रोड किमती आहेत. टीव्हीएस मोटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष (इलेक्ट्रिक वाहन) मनू सक्सेना म्हणाले की, टीव्हीएस देशात ईव्ही ट्रान्सफॉर्मेशन वाढवत आहे. गेल्या आर्थिक वर्षात टीव्हीएस iQube ने 1,00,000 युनिट्सच्या विक्रीचा आकडा गाठला आहे.
सक्सेना यांच्या मते, हा आकडा दाखवतो की लोक TVS इलेक्ट्रिक स्कूटरवर खूप खूश आहेत. मे 2023 मध्ये टीव्हीएसने 20,000 युनिट्सची विक्री करण्याचा टप्पा गाठला आहे. सध्या तुम्ही टीव्हीएस iQube आणि iQube S बुक करू शकता. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 78 किमी/तास आहे. एकदा फूल चार्ज केल्यानंतर iQube 100 किमी अंतर कापू शकते. तसेच, 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 4 तास 30 मिनिटे लागतात.