नवी दिल्ली : सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. वाहन या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री उच्च स्तरावर राहिली, या महिन्यात 75,000 हून अधिक इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत, ऑक्टोबर 2022 मध्ये जवळपास 30 टक्के अधिक विक्री झाली. पण, यामध्ये टीव्हीएसचे (TVS) कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान नव्हते. टॉप-5 बेस्ट-सेलिंग इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादकांच्या यादीत टीव्हीएसला स्थान मिळवू शकले नाही, परंतु टीव्हीएस या महिन्यात विक्रीवर खूप लक्ष देत आहे.
टीव्हीएसने दिल्लीत एकाच दिवसात ग्राहकांना TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरच्या 200 युनिट्स विकल्या आहेत. म्हणजे, एका दिवसात 200 युनिट्सची डिलिव्हरी झाली. दिल्लीत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कमी वीजदर आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठीची सरकारची धोरणे असल्याचे म्हटले जाते.
टीव्हीएसने लाँच झाल्यापासून शहरात TVS iQube आणि TVS iQube S च्या 2,000 हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. यामध्ये 'मेगा डिलिव्हरी इव्हेंट' दरम्यान 200 स्कूटरची डिलिव्हरी देखील समावेश आहे. यावेळी ग्राहकांना त्यांच्या TVS iQube आणि TVS iQube S इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आल्या. या स्कूटर सिंगल चार्जमध्ये 100 किमीची रेंज देतात. TVS iQube इलेक्ट्रिक सिरीजची नवीन रेंज या वर्षाच्या सुरुवातीला तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली होती.
नवीन TVS iQube आणि TVS iQube S व्हेरिएंट 3.4 kWh बॅटरी पॅकसह येतात. यामध्ये 7 इंच TFT डिस्प्ले, HMI कंट्रोल आणि रिव्हर्स पार्किंग सारखी फीचर्स आहेत. तसेच, स्कूटरचे टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट, TVS iQube ST ला 5.1 kWh बॅटरी पॅक मिळतो, जो प्रति चार्ज 140 किमीची रेंज देतो. याचबरोबर, TVS iQube आणि TVS iQube S दिल्ली-एनसीआरमध्ये अनुक्रमे 99,130 रुपये आणि 1.04 लाख रुपये ऑन-रोड किमतीत उपलब्ध आहेत. ही किंमत FAME II आणि राज्य अनुदान लागू केल्यानंतर आहे.