नवी दिल्ली: देशातील आघाडीची टू-व्हीलर कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटरने (टीव्हीएस मोटर) 122 वर्षांची जुनी Norton Motorcycles ही ब्रिटिश कंपनी 153 कोटी रुपयांत खरेदी केली आहे. नॉर्टन हा एक ब्रिटिश ब्रँड असून, तो जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता भारतातही Commando, Dominator आणि V4 RRसारख्या शक्तिशाली बाइक सहज उपलब्ध झाल्यास आश्चर्य वाटायला नको. नॉर्टन मोटारसायकल ब्रिटनमधली एक मोठी आणि प्रसिद्ध बाईक निर्माता कंपनी आहे, परंतु अलीकडील काळात कंपनी अडचणींचा सामना करत आहे. कंपनीकडे रोखीची समस्या असल्यानं तिला अनेक ऑर्डर पूर्ण करता आलेल्या नाहीत. त्याचवेळी कंपनीचे आधीचे मालक स्टुअर्ट गार्नर यांच्यामागेसुद्धा कथित फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमध्ये चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. टीव्हीएसने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने आपल्या परदेशी सहाय्यक कंपनीमार्फत नॉर्टन मोटरसायकल (ब्रिटिश) लिमिटेडची खरेदी केली आहे. जीबीपी 16 मिलियन (सध्याच्या भारतीय चलनात 153 कोटी रुपयांत)मध्ये हा करार झाला आहे. Norton Motorcyclesची खरेदी केल्यानंतर येत्या काळात टीव्हीएसच्या जबरदस्त बाइक बाजारात पाहायला मिळणार आहेत. टीव्हीएसने निवेदनात म्हटले आहे की, येत्या काळात ऐतिहासिक मोटारसायकल ब्रँडची मागणी अधिक वाढणार असून, टीव्हीएस मोटर कंपनी आंतरराष्ट्रीय दुचाकी बाजारात वेगानं वाढेल. तसेच भारताच्या विकासात खांद्याला खांदा लावून आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही प्रगती करणार आहोत. टीव्हीएसने बीएमडब्ल्यू मोटोर्राडबरोबर करार केलेला असून, बीएमडब्ल्यू जी 310 आर आणि बीएमडब्ल्यू जी 310 जीएसचं उत्पादन टीव्हीएस प्लांटमध्येच केले जात आहे. तसेच टीव्हीएसचे स्वतःचे मोटरसायकल आधारित प्लॅटफॉर्म टीव्हीएस TVS Apache RR 310 देखील उपलब्ध आहे.
TVS Motorकडून ब्रिटनच्या Norton Motorcyclesची खरेदी; बनवणार 1000 ccच्या जबरदस्त बाइक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 4:08 PM