नवी दिल्ली : टीव्हीएस मोटर (TVS) कंपनी देशात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवीन स्कूटरचे मॉडेल सध्या टेस्टिंगच्या टप्प्यात आहे. TVS ची नवीन स्कूटर क्रेऑनवर आधारित असू शकते, जी कंपनीने 2018 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली होती. TVS बंगळुरमध्ये क्रेऑन इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग करत आहे, ज्याचे फोटो समोर आले आहेत.
TVS ची भारतातील ही दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर असेल. यापूर्वी कंपनीने TVS iQube आणले होते. TVS च्या नवीन स्कूटरची रेंज iqube पेक्षा चांगली असेल असे म्हटले जात आहे. सध्या TVS iqube स्कूटरची विक्री चांगली होत आहे. जुलै महिन्यात 4258 युनिटची विक्री झाली होती. रिपोर्ट्सनुसार, आगामी TVS इलेक्ट्रिक स्कूटरचे काही कंपोनेंट्स iQube सारखे असतील. तसेच, हे मॅक्सी स्कूटर सेगमेंटमध्ये येऊ शकते. TVS क्रेऑनचा लूक शार्प असेल आणि यात मोठा टचस्क्रीन पॅनल दिला जाऊ शकतो.
नवीन TVS इलेक्ट्रिक स्कूटरचे स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेले नाहीत. मात्र, रिपोर्टनुसार, कंपनी TVS क्रेऑन आधारित स्कूटरमध्ये 12kW इलेक्ट्रिक मोटरसह तीन लिथियम-आयन बॅटरी देऊ शकते. कंपनीचा दावा आहे की, आगामी स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किमी पेक्षा जास्त प्रवास करू शकते. स्कूटरमध्ये स्टेप-अप सीट डिझाइन, इंटिग्रेटेड ग्रॅब रेल आणि रेक्टेंग्युलर रिअर व्ह्यू मिरर मिळू शकतात.
याचबरोबर, रिपोर्टच्या म्हणण्यानुसार, TVS क्रेऑन आधारित स्कूटर क्रॅश अलर्ट, अँटी-थेफ्ट अलर्ट, नेव्हिगेशन असिस्ट आणि शेवटचे पार्क केलेले ठिकाण यासारख्या फीचर्ससह सुसज्ज असेल. TVS SmartXonnect अॅपद्वारे सर्व प्रकारचे डिटेल्स स्मार्टफोनवर उपलब्ध असतील. कंपनीच्या मते, VS क्रेऑन एका चार्जवर इको मोडमध्ये 150 किमी पर्यंत चालवता येते. याशिवाय, स्कूटरचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास असू शकतो. TVS इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. गेल्या वर्षी कंपनीने या विभागासाठी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या वर्षीही तेवढीच रक्कम गुंतवणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.