आज नवीन कार घेणे आणि जुनी आहे ती सांभाळणे खूप खर्चिक झाले आहे. अनेकांना अशा काही फॉल्टी कार मिळत आहेत, जिची दुरुस्ती करता करता नाकीनऊ येत आहे. इतिहासात रोल्स रॉयससारख्या कारला कचरागाडी केल्याच्या घटना आहेत. असे असताना अशा प्रकारचा निषेध नोंदविणे आजही सुरु आहे. आता नवी घटना आनंद महिंद्रांच्या कंपनीच्या बाबतीत घडली आहे.
महिंद्रा एक्सयुव्ही ३०० ला एका नाराज ग्राहकाने कचरागाडी बनविली आहे. महत्वाचे म्हणजे त्याने गाडीच्या बॉनेटवर थेट आनंद महिंद्रांचे नाव लिहिले आहे. वनइंडिया पंजाबीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. ही घटना पंजाबमधून समोर आली आहे. महिंद्रा डीलरशीपकडून एकदम नवीन XUV300 SUV खरेदी केली होती, नवा लोगोही दिसत आहे. कार खरेदी केल्यानंतर मालक त्याच्या कुटुंबासह बाहेर फिरायला गेला. तेव्हा त्याला गाडीत समस्या जाणवली.
काही वेळाने कार बंद पडली. डीलरशीपकडे तो ती कार घेऊन गेला. जवळपास 10 दिवस सर्व्हिस सेंटरच्या चकरा मारल्या, परंतू समस्या काही ठीक झाली नाही. जेव्हा त्याने याची तक्रार केली तेव्हा त्याला डीलरशीपकडून धमकावण्यात आले. आम्ही कार दुरुस्त करणार नाही तसेच अन्य कोणत्याही डीलरला करू देणार नाहीत, असे मालकाने म्हटले आहे. वारंवार तक्रारी करूनही गाडी दुरुस्त होत नसल्याने शेवटी अनोखे आंदोलन सुरु केले आहे.
त्याने युज मीचा स्टीकर लावत ती गाडी डस्टबिनम्हणून जाहीर केली. कार उपयोगाची नसून ती कचरा कुंडी म्हणून वापरणार आहे. डीलरशिपने कार परत घ्यावी अशी त्याची मागणी आहे. यावर त्याने आनंद महिंद्रा यांचा १५ लाखांचा डस्टबिन माझ्याकडे आहे, अशा आशयाचा बॅनर लावला आहे आणि या कारमध्ये कचरा भरत आहे. या बॅनरवर त्याने त्याचा मोबाईल नंतरही दिला आहे. आता आनंद महिंद्रा त्याच्या या आंदोलनाची दखल घेतात का हे पाहणे गरजेचे आहे.
धक्कादायक बाब म्हणजे डीलरने गाडी सर्व्हिस सेंटरमध्ये आल्यानंतर गाडीवरील बंपर आणि ग्रील बदलले आहेत, त्यावर महिंद्राच जुना लोगो आहे, तर पाठीमागे नवा लोगो आहे.