रस्त्यावरील वाहतूक, पादचाऱ्यांचे येणे-जाणे, वाहनांचे अनावश्यक वेग आदी बाबींसाठी काही ना काही उपाय शोधले जात असतात. अशामधून स्पीडब्रेकर वा गतीअवरोधक याचा अवलंब केला जाऊ लागला मात्र यामुळे अनेकदा वाहनचालकांनाही त्रास होत असतो. अकस्मातपणे गतीअवरोधक आल्याने त्यांची कार त्यावर आदळली जाते, आतील लोकांना जसा त्रास होतो, तसा ड्रायव्हरलाही त्याचा त्रास होतो, वाहन नियंत्रण करणे हे त्याक्षणी काहीसे त्रासदायक होते. मोटारसायकल वा स्कूटर चालकांना तर काहीवेळा अचानक दणका बसल्याने पडावेही लागते. काहीवेळा उंचवट्यामुळे नियंत्रम जाते, वेग नियंत्रणात असूनही त्या दुचाकीचालकाला तेथे तोल सावरता येत नाही. अशा अनेक त्रासदायी गोष्टी घडतात.
यावर आणखी एक उपाय जगात आणला गेला आहे. तो म्हणजे थ्री डी पेंटिंग्जच्या सहाय्याने स्पीडब्रेकर चितारण्याचा. अद्याप भारतात तो आणला गेलेला नाही. काही ठिकाणी भारतात त्याचे चाचणी प्रयोगही झाले. या सर्वांमधून एक उद्देश साध्य करायचा आहे तो म्हणजे वाहनाचा वेग आवश्यक त्या ठिकाणी कमी झाला पाहिजे, त्या वेगामुळे कोणताही अपघात होऊ नये व वाहतुकीलाही अडथळा होऊ नये, विनाकारण मोटारी थांबवल्या जाऊ नयेत व विशेष म्हमजे ड्रायव्हरने हे सारे करायला हवे. त्या ड्रायव्हरच्या मनामध्ये वेगाविषयी असलेली मानसिकता हा मूळ भाग असतो, त्याचाच विचार करून थ्री डी पेंटिंग्जचे स्पीडब्रेकर चितारले गेले तर ते पाहाताच दृष्टीभ्रम होऊन ड्रायव्हर स्पीडब्रेकर योग्य नियंत्रितपणे पार करील व त्यामुळे त्याला, त्याच्या कार वा वाहनाला वा आतील प्रवाशांनाही धक्का बसणार नाही.
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही या संबंधात ट्वीट करून आपले मत व्यक्त केले होते. देशामध्ये स्पीडब्रेकर्सच्या संख्येचा विचार करता त्याची अनावश्यकता पाहाता या प्रकारच्या थ्री डी पेंटिंग्जचा वापर करून स्पीडब्रेकर चितारण्याचा विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. अशा प्रकारचा उपाय रस्त्यांवर अवलंबिल्यास उपयुक्त ठरू शकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. या थ्री डी पेंटिंग्जमुळे झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणीही स्पीड ब्रेकरचे चित्र चितारलेले बघितले तर तेथे काही बांधकाम केलेले आहे की काय असा भास होतो, त्यामुळे त्या ठिकाणी काही उंचवट्याचा भाग असावा, असे ड्रायव्हरच्या मनात स्पष्टपणे येते, इतके थ्री डी पेंटिंग्ज प्रभावी आहे.
अर्थात याप्रकारच्या थ्री डी पेंटिंग्जचा अवलंब कसा करावा, कुठे करावा, कशा पद्धतीने करावा, पूर्णपणे विद्यमान प्रकारचे गतीअवरोधक काढून टाकावेत की काही ठिकाणी ठेवावेत, का एक सोडून एक अशा पद्धतीने गती अवरोधकांच संख्या कमी करून थ्री डी पेंटिंग्जच्या सहाय्याने हे नवे गतीअवरोधक तयार करावेत, हा नक्कीच चर्चेचा विषय ठरू शकेल. सध्या तरी याची अंमलबजावणी झालेली नसली तरी एक वेगळा मार्ग म्हणून नक्कीच विचार करता येईल किमान अनावश्यक ठिकाणी असमारे स्पीडब्रेकर्स कमी तरी होतील.