मुंबई : पुण्यातील स्टार्टअप कंपनी डेकालीप टेक्नॉलॉजीने कार वापरणाऱ्यांसाठी आगीपासून सुरक्षा करणारी यंत्रणा बनविली आहे. उन्हाळ्यात किंवा तांत्रिक बिघाडमुळे कारनाआग लागण्याचे प्रकार घडत असतात. यामुळे वित्तहानीसोबत प्राणहानीही होते. यापासून वाचण्यासाठी या कंपनीने बनविलेला पाईप मदत करणार आहे.
कंपनीने थ्रो आणि एफ-प्रोटेक्ट अशी दोन उत्पादने बनविली आहेत. थ्रो हे पेपरवेट किंवा फुलदानीच्या आकाराचे आहे. ते घरात, कार्यालयात किंवा हॉटेलमध्ये ठेवता येते. तर एफ-प्रोटेक्ट हे पाईपसारखे दिसणारे कारच्या बॉनेटखाली ठेवायचे आहे. या दोन्ही वस्तूंचे अनावरण अभिनेता सुनिल शेट्टी यांनी केले आहे.
घरात किंवा इतरत्र आग लागल्यास थ्रो हे त्यावर फोड़ल्यास आगीला ऑक्सिजनचा पुरवठा कमी करते. यामुळे आग तात्काळ विझते. तर एफ प्रोटेक्ट हे पहिलेच स्वयंचलित आग प्रतिबंधक उपकरण आहे. जे कारच्या इंजिनच्या भागाला आग लागताच फुटते. यामध्ये स्मार्ट हिट तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. आगीवर फुटल्याने यातील बिनविषारी रसायन आगीचा ऑक्सिजनशी संपर्क तोडते. यामुळे तातडीने आग विझत असल्याने पुढील दुर्घटना टळते.
मुंबई, पुण्यामध्ये रोज लाखो गाड्या रस्त्यावर धावत असतात. अशावेळी बर्निंग कार किंवा बसचा थरार आपण पाहतो. यामध्ये कारमधून बाहेर न पडता आल्याने अनेकदा मृत्यू झालेले आहेत. किंवा अपघातानंतरही कारला आगी लागल्याचे प्रकार घडले आहेत. अपघातात वाचले असले तरीही चालकासह प्रवासी आगीत ठार झाल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे ही यंत्रणा आगीपासून वाचण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
वाहनामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एबीएस, ईबीडी, एअर बॅग, सीटबेल्ट सारखी सुविधा असते. मात्र, आगीपासून बचावासाठी कोणतीही यंत्रणा नसते. यामुळे दोन लाखांच्या कारपासून अगदी 2 कोटींच्या कारलाही आग लागण्याचा धोका असतो. सीएनजी, पेट्रोलच्या कारना आग लागण्याचा मोठा धोका असतो.