हॉर्न म्हणजे एक विशिष्ट आवाज, ध्वनि निर्माण करणारे साधन आहे. जहाजापासून ते सायकलपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बसवलेले हे साधन काही विशिष्ट उद्दिष्टांसाठी आहे.ते टाईमपास म्हणून बसवलेले नाही. आज वाढत्या वाहनांबरोबर व वाढत्या शोधांबरोबर या हॉर्नचे प्रकारही वाढले आहेत. साध्या भाँपूपासून ते इलेक्ट्रिकल हॉर्नपर्यंत तयार करण्यात आलेल्या या हॉर्नच्या प्रकारांमध्ये आवाजाचे प्रकारही बरेच आले आहेत. रस्त्यावरील वाहतुकीमध्ये आपल्या समोर आलेल्या काही अनाकलनीय व्यक्ती, प्राणी वा अन्य वाहन यांना आधीच सावध करण्यासाठी व अपघातासारखी घटना टाळण्यासाठीव त्या संबंधिताचे लक्ष वेधून त्याला आपल्या वाहनाचे अस्तित्त्व लक्षात यावे व तो संबंधित सावध व्हावा,यासाठी वाहनांमधील हॉर्नचा वापर अपेक्षित आहे. छान आवाज येतो, वेगळा आवाज येतो,यासाठी विनाकारण एखाद्याचे लक्ष वेधणे, अचानक हॉर्न वाजवून कोणाला घाबरवणे यासाठी हॉर्न वाहनांना बसवलेले नाहीत. आजकाल विविध प्रकारच्या हॉर्नचा वापर वाहनांमध्ये केला जातो. हॉर्न कोणत्या पद्धतीचा असवा, याचे काही नियम आहेत,आरटीओने त्याचे निकष ठरवलेले आहेत. मात्र अनेकजण ते निकष पाळत नाहीत, बाजारात एखादी वेगळी चीज दिसली की ती आपल्या वाहनामध्ये हवीच असा काहींचा अट्टाहासच असतो. या मानसिकतेतूनच वेगवेगळ्या आवाजाच्या हॉर्नचे प्रकार निघाले असावेत. हॉर्न वापरण्यासाठी काही सूचना जरूर लक्षात घ्या. आरटीओच्या नियमानुसार असलेल्या हॉर्नखेरीज अन्य हॉर्न बसवू नका, आपला हॉर्न हा दुसऱ्याला त्रास होण्यासाठी नाही, याची काळजी घ्या. काहीवेळा हॉर्नच्याऐवजी हेडलॅम्पच्या अप्पर-डिप्पर प्रकाशझोताचा वापर करा,जास्तकाळ हॉर्न वाजवत राहाण्याची सवय टाळा, हॉर्नचा वापर करून अन्य चालकाला आव्हान देणे, त्रास होईल असा वापर करणे, म्युझिकल हॉर्न बसवणे, कोणाला तरी बोलवण्यासाठी हॉर्नचा वापर करणे, एकापेक्षा जास्त हॉर्न वा मोठ्या आवाजाचे हॉर्न बसवणे हे प्रकार प्रत्येक वाहनचालक व मालकाने टाळलेच पाहिजेत. दुचाकीचा हॉर्नही त्या दुचाकीसाठी असतो, त्याला मोठ्या वाहनाच्या हॉर्नसारखा, किंवा कुत्र्याच्या आवाजासारखा आवाज देणारा वा अतिमोठा आवाज करणारा हॉर्न बसवणे हा गुन्हा व सार्वजनिक गैरवर्तनाचाच भाग म्हणावा लागेल. थोडक्यात काय हॉर्नचा वापर योग्यपद्धतीने, आवश्यक तेव्हाच करा व ध्वनिप्रदूषण टाळा. कारण हॉर्नचा वापर सुरक्षितता, आणीबाणीच्या प्रसंगासाठी असतो. हॉर्न म्हणजे म्युिझकल इन्स्ट्रुमेंट नाही, हे ध्यानात घेण्याची गरज आहे.
हॉर्नचा वापर कमी करून जाणीवपूर्वक टाळा ध्वनिप्रदूषण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 9:21 PM