कारमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले. त्यात म्युझिक सिस्टिममध्येच व स्टिअरिंग व्हीलवर काही नियंत्रण दिली गेली. त्यात मोबाईल फोनचेही नियंत्रण दिले गेले. मुळात हॅण्ड्सफ्री म्हणून जरी ते साधन उपलब्ध करून देण्यात आले असले तरीही मोबाईलचा वापर कार चालवताना ड्रायव्हरने करणे हीच मुळात कायद्याचे उल्लंघन करणारी बाब आहे. ते कोणीही लक्षात कसे घेत नाही, हा आश्चर्याचा भाग म्हणाला पाहिजे. कार वा वाहन चालवताना मोबाईल अर्थवटपणे कानाला लावून संभाषण करणे,कानात ब्लुटूथद्वारे संभाषण करणे किंवा म्युझिक सिस्टिममध्ये असलेल्या अन्य सुविधांच्या आधारे मोबाईलवर संभाषण हेच चुकीचे आहे.
फोनवर बोलणारा माणूस कितीही कुशल कारचालक असला तरी तो माणूस असतो, त्याला भावना असतात. त्यामुळे फोनवर होणारे संभाषण कशा प्रकारे होत असेल व त्याचे पडसाद कार चालवताना कशा प्रकारे पडू शकतील, याचा काहीही नेम नसतो. प्रत्येक कार चालकाने, मालकाने इतकेच काय तर भाड्याच्या कारमधून जाणाऱ्या प्रवाशानेही लक्षात ठेवून कार चालवत असताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकाला तेथल्या तेथे ते बंद करायला सांगितले पाहिजे.मोबाईल ही सुविधा संपर्क साधण्यासाठी आहे. पण त्यासाठी तुम्ही तुमची कार वा वाहन एकतर रस्त्याच्या बाजूला न्या, थांबवा व मगच त्यावर संभाषण करा. अनेकदा तसे न करणारी ड्रायव्हर्सची टक्केवारी पाहिली तर साठ टक्क्यांपेक्षा जास्त ड्रायव्हर्स हे मोबाईल फोनचा वापर ड्रायव्हिंग करताना सर्रास करीत असल्याचे दिसेल वा आढळेल. तो ड्रायव्हर गाडीचा मालक असो की पगारी त्याने वाहन चालवताना असे संभाषण करणे म्हणजे स्वतःबरोबर अन्य लोकांच्या प्राणालाही धोक्यात घालण्यासारखे आहे. दुर्दैवाने अजूनही मोबाईलवर बोलणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली गेली असल्याचे दिसत नाही.मोबाईलचा अतिरेकी वापर हा त्याही पलीकडे गेला आहे. जीपीएस प्रणाली वापरण्यासाठीही मोबाईल काचेला अडकवून ड्रायव्हिंग करणारे अनेकजण दिसू लागले आहेत. काळ्या काचेच्या आत ड्रायव्हर मोबाईलवर बोलताना आजही दिसतात. मुळात अशा प्रकारचे कृत्य हे केवळ मोबाईलवर बोलणाऱ्याच्याच नव्हे तर अन्य वाहने, पादचारी यांच्यादृष्टीनेही विघातकच म्हटले पाहिजे.
आंबोली या हिलस्टेशनवर कावळे साद पॉइंटला दोन मद्यधुंद तरुणांचा दरीत पडून झालेला मृत्यू ही घटना देखील या मोबाईल वापरणाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जवळीक साधणारी आहे, असे म्हणावे लागते. अनेकदा मोबाईल वापरून कार चालवणाऱ्याला सांगायला गेले तर ते लोक वसकन तुमच्याच अंगावर ओरडतील, व कोण मला कशाला शिकवतो, अशा थाटात ते नजर देतील. आपण कार चालवताना, दुचाकी चालवताना मोबाईल वापरणे हे चुकीचे घातक कृत्य करीत आहोत, याची त्यांना सुतराम जाणीव नसते.
मोबाईल ड्रायव्हिंग करताना वापरणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे,अशा ठाम विश्वासामध्ये असे अनेक वाहन चालक आज वावरत आहेत. तेव्हा प्रत्येकाने अशा वाहन चालकांच्या असंतोषाचे 'जनक' बनण्यापासून सावधान... इतकेच म्हणू शकतो.कदाचित मोबाईलधारक आपल्या अधिकाररक्षणासाठी चांगले सांगणाऱ्यावरच खटला भरायचा, अशीही वेळ येईल की काय याचीच आता भीती वाढू लागली आहे.