साबण तसा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. आंघोळीसाठी, हात-पाय, चेहरा धुण्यासाठी तुम्हाला निर्जंतूक करणारा, स्वच्छ ठेवणारा आणि ताजेतवाने वाटू देणारा साबण जसा आपल्या शरिराला टवटवीत ठेवतो तसाच तो कारलाही स्वच्छ करण्यासाठी मदत करतो. मऊशार त्वचेला अमूक, कोरड्या त्वचेला तमूक साबण वापरा अशा जाहिराती आपण नेहमीच पाहात असतो. कारचेही तसेच आहे. खास कारसाठी साबण वा लिक्विड सोप बाजारात आणले जात असतात. वास्तविक हा त्या त्या कंपनीच्या मार्केटिंगचा भाग आहे. त्यांच्या साबणात आणि आपण घरी वापरतो त्या साबणातील घटक वेगळे नसतात. साधारण सारऱखेच असतात. फक्त प्रमाण नेमके ठेवलेले असते. छानपैकी वेगळा सुगंधही त्याला दिलेला असतो. तुम्ही घरात आंघोळीसाठी वापरला जाणारा साबण वा लिक्विड सोप काहीसा डायल्यूट करून कारच्या स्वच्छतेसाठी वापरायला काहीच हरकत नाही. अर्थात कपडे वा भांडी धुण्याचा साबण वा पावडर वापरू नका. त्याचे स्वरूप व त्याची तीव्रता कशी असेल ते काही सांगता येत नाही. हात धुवायचा लिक्विड सोप किंवा आंघोळीसाठी वापरला जाणारा चांगल्या दर्जाचा साबणही कारच्या धुण्यासाठी वापरू शकता. अर्थात तो महाग पडेल असे वाटणे स्वाभाविक आहे.
कारच्या आतील भागात डॅशबोर्ड, आसनावरील कव्हर्स, प्लॅस्टिक यासाठी आंघोळीचा साबण मस्तपैकी वापरता येतो. साधारण एका प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात तुमच्या हाताचा साबण हातामध्ये ठेवून तुमच्या हाताला लावून त्याचे पाणी त्या भांड्यात जे तयार होऊल तितका माईल्ड सोप तुम्हाला पुरेसा आहे. प्रथम गाडीचा अंतर्भाग सुक्या फडक्याने वे ब्रशने साफ करून घ्या, त्यानंतर गाडीला आंतील भागात मॅटिंग वा लॅमिनेशन केलेले असेल तर त्यावर असलेले रबरी मॅटही काढून घ्या. व साफ करून घेतल्यानंतर साबणाच्या माईल्ड द्रावणात कपडे भिजवून सारे पुसून घ्या. जेथे डाग असेल तेथे थोडा साबणाचा वापर करून ते पुसून घ्या. हे सर्व झाल्यानंतर साध्या पाण्यातील ओलसर कपड्याने हा सर्व भाग पुसून घ्या. इतके केले तरी मोटारीच्या अंतर्भागातील स्वच्छता भरपूर झाली. अर्थात धुळीच्या रस्त्यावरून मोटार जाऊन आली असेल व आतमध्ये जास्त धूळ असेल तर शक्यतो त्यामुळे खराब झालेला कारचा आतील भाग हा व्हॅक्यूम क्लीनरने साफ केलेला अधिक चांगला. आतमध्ये असमारी माती प्रथम पूर्ण काढून टाकली गेल्याची खात्री झाल्यावर मग वरील पद्धतीने गाडीच्या आंतील भागांची सफाई करणे शक्य होऊ शकेल. माती असतानाच ओल्या फडक्याचा वा साबणयुक्त फडक्याचा वापर करू नका. घरामधील वापरलेले साबणाचे तुकडे एकत्र ठेवून गाडीचा बाह्य भाग धुतानाही चांगला उपयोग होतो. तेव्हा साबणाच्या तुकड्यांना टाकावू समजू नका. थोडक्यात गाडीसाठी खास वेगळा साबण तयार केला जात असला तरी तो वापरलाच पाहिजे, अशी अजिबात आवश्यकता नाही.