नोंदणीकृत इलेक्ट्रीक वाहनांच्या बाबतीत उत्तर प्रदेश आता आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक नोंदणीकृत इलेक्ट्रीक वाहनांची संख्या उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे. गडकरींनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटलं की, सध्या देशात 870,141 इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक 2,55,700 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी उत्तर प्रदेशात झाली.
रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत इलेक्ट्रीक वाहनांच्या बाबतीत दिल्ली दुसऱ्या आणि कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत 125,347 इलेक्ट्रीक वाहने नोंदणीकृत आहेत, तर कर्नाटकात 72,544 वाहनांची नोंदणी झाली आहे. बिहार आणि महाराष्ट्र अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. बिहारमध्ये 58,014 ईव्ही आणि महाराष्ट्रात 52,506 नोंदणीकृत ईव्ही आहेत.
FAME इंडिया स्कीमचा दुसरा टप्पाअवजड उद्योग मंत्रालयाने 2015 मध्ये भारतात इलेक्ट्रीक, हायब्रीड वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोल-डिझेल अवलंबित्व कमी करण्यासाठी फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ (हायब्रिड एन्ड) इलेक्ट्रीक व्हेइकल्स इन इंडिया ही स्कीम तयार केली. सध्या, FAME India योजनेचा दुसरा टप्पा 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. हा टप्पा 1 एप्रिल 2019 पासून लागू झाला. याशिवाय इलेक्ट्रीक वाहनांवरील जीएसटी 12 वरून 5 टक्के करण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले. त्याचबरोबर इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जर आणि चार्जिंग स्टेशनवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.