लॉकडाऊनमध्ये संपलेली ड्रायव्हिंग लायसन, आरसी बुक आणि परमिटची व्हॅलिडीटी केंद्र सरकारने चौथ्यांदा वाढविली आहे. 31 डिसेंबरला ही सूट संपणार होती. ती आता 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या नव्या निय़मांनुसार जर ड्रायव्हिंग लायसन नसेल तर 5000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वैधता संपलेले ड्रायव्हिंग लायसन म्हणजेही विना लायसन मानण्यात येते. यामुळे १ जानेवारीपासून पुन्हा लायसन तपासणी सुरु होणार होती. यामुळे आरटीओमध्ये ऑनलाईन, एजंटांद्वारे लायसन मुदतवाढ, आरसी मुदतवाढ आणि अन्य कामांसाठी मोठी गर्दी झाली होती. अनेकांना ऑनलाईनद्वारे अर्ज केल्यानंतर महिनामहिना नंतरची तारीख मिळाली होती. हा सर्व त्रास लक्षात घेत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ही मुदत तीन महिन्यांनी पुन्हा वाढविली आहे.
मुदत वाढविली म्हणजे ड्रायव्हिंग लायसन, आरसी बुक रिन्यू करून घेऊ नका असे नाही. तर या तीन महिन्यांत गर्दी न करता वाहनचालकांना काम सोपे व्हावे यासाठी याचा वापर करता येणार आहे. या काळात तुम्ही तुमची कायगदपत्रे रिन्यू करू शकणार आहात. ही सूट ज्यांच्या कायगदपत्रांची मुदत 30 मार्च 2019 नंतर संपलीय त्यांच्यासाठी लागू असणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लॉकडाऊनदरम्यान एका आदेश जारी करून मुदत संपलेले ड्रायव्हिंग लासयन्स, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट आणि अन्य कागदपत्रांची वैधता ३० जून २०२० पर्यंत वाढवली होती. मात्र जून महिन्यापर्यंत परिस्थितीत फार सुधारणा न झाल्याने ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली गेली होती. या मुदतीमध्ये सरकारने तिसऱ्यांदा वाढ करून ती डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली होती.
ड्रायव्हिंग लायसन कसे रिन्यू कराल?
- ड्रायव्हिंग लायसन रिन्यू करण्यासाठी परिवाहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. parivahan.gov.in वर "ड्रायव्हिंग लायसन-संबंधित सेवा" वर क्लिक करावे लागणार आहे.
- यानंतर अर्जदाराला "डीएल सेवा" वर क्लिक करावे लागेल. यामध्ये लायसन नंबरसह अन्य माहिती भरावी लागणार आहे. यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- जवळच्या आरटीओ कार्यालयात अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.
- आरटीओमध्ये गेल्यावर बायोमेट्रिकद्वारे कागदपत्रे तपासली जाणार आहेत. यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन दिले जाणार आहे.
- हीच प्रक्रिया वाहनाच्या आरसी नुतनीकरणाची देखील आहे. मात्र, यासाठी तुम्हाला पीयुसी, इन्शुरन्स आदी कागदपत्रे लागणार आहेत.