लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ग्राहकांकडून येत असलेली वाढती मागणी आणि अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याने डिसेंबर महिन्यामध्ये देशातील वाहनांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांच्या विक्रीमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशामधील छोट्या कारच्या विक्रीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये वाढ झाली आहे. सर्वात मोठी उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या विक्रीमध्ये १७.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या कंपनीच्या अल्टो आणि एसप्रेसो या छोट्या कारची मागणी ४.४ टक्क्यांनी वाढलेली दिसून आली. ह्युंदाई मोटर्सची विक्रीही डिसेंबर महिन्यामध्ये चांगली राहिली. या कंपनीच्या विक्रीमध्ये २४.८९ टक्के वाढ झाल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. याशिवाय महिंद्र ॲण्ड महिंद्र आणि होंडा कार्स या कंपन्यांनीही गतमहिन्यामध्ये आपल्या कारची विक्री वाढल्याचे जाहीर केले आहे.
महिंद्रच्या गाड्यांची मागणी ३ टक्क्यांनी वाढल्याचे कंपनीने जाहीर केले. मात्र कंपनीची एकूण विक्री मात्र या महिन्यामध्ये कमी झालेली दिसून येत आहे. टोयोटा किर्लोस्करची विक्री डिसेंबर महिन्यामध्ये १४ टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात या कंपनीच्या ६५४४ वाहनांची विक्री झाली होती. त्यामध्ये यंदा वाढ होऊन ती ७४८७ झाली आहे. होंडा कार्सची देशांतर्गत विक्री २.६८ टक्क्यांनी वाढली आहे. तर एमजी मोटर इंडियाची विक्री ३३ टक्क्यांनी वाढल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
चालू वर्षामध्ये मोठ्या वाढीची अपेक्षादेशातील वाहन उद्योगामध्ये सन २०२१मध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबतचा एक अहवाल नोमुरा रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रकाशित केला आहे. त्यामध्ये वरील आशावाद व्यक्त करण्यात आला असून देशामध्ये इलोक्ट्रीक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यताही वर्तविली गेली आहे. कोरोनाचा वाहन उद्योगाला मागील वर्षामध्ये मोठा फटका बसला तरी आगामी वर्षात या उद्योगाचे भवितव्य चांगले दिसते. देशामधील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढून त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याची अपेक्षाही या अहवालात वर्तविण्यात आली आहे.