Vehicle Sales Data: देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वाहनांची विक्री होते? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही महाराष्ट्र आणि दिल्लीचे नाव घ्याल, कारण त्या राज्यात सर्वाधिक ट्रॅफिक जामच्या समस्या उद्भवतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सर्वाधिक कार आणि बाईक खरेदी करण्याच्या बाबतीत दिल्ली आणि महाराष्ट्र नव्हे तर उत्तर प्रदेश अव्वल आहे. इंडस्ट्री ऑर्गनायझेशन सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) ने ही माहिती दिली आहे.
पहिल्या क्रमांकावर यूपी आणि दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रचालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वाहन विक्रीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आणि तामिळनाडू चौथ्या क्रमांकावर आहे. सियामच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये एकूण 8,22,472 प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांची विक्री झाली. यामध्ये दुचाकी आणि तीनचाकी श्रेणीतील वाहनांचाही समावेश आहे. तर महाराष्ट्र 6,88,192 युनिटसह दुसऱ्या क्रमांकावर आणि गुजरात 4,21,026 युनिटसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर तामिळनाडूमध्ये 4,19,189 वाहनांची विक्री झाली आहे.
तीन चाकी आणि दुचाकी वाहनांमध्येही उत्तर प्रदेश अव्वल ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 23859 तीन चाकी वाहनांची विक्री झाली. यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 20,495 तीनचाकी वाहनांची विक्री झाली. यानंतर गुजरातमध्ये 19,743 आणि बिहारमध्ये 14,955 तीनचाकी वाहनांची विक्री झाली. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेश दुचाकी श्रेणीच्या विक्रीतदेखील अव्वल स्थानावर असून, एकूण 6,73,962 बाइक्सची विक्री झाली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र (5,15,612), मध्य प्रदेश (3,35,478) आणि तामिळनाडू (3,24,918) यांचा क्रमांक लागतो.
कार विक्रीत महाराष्ट्र अव्वलकार खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकले असून, राज्यात एकूण 1,21,030 युनिट्सची विक्री झाली. यानंतर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे एकूण 1,01,568 कार विकल्या गेल्या. गुजरात (85,599) आणि कर्नाटक (71,549) तिसऱ्या स्थानावर आहे. व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीतही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिला आणि जवळपास 31,055 वाहनांची विक्री झाली. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश (23,083), गुजरात (20,391) आणि कर्नाटक (16,966) यांचा क्रमांक लागतो.