कमकुवत होत चाललेली आर्थिक स्थिती आणि उच्च व्याज दरांमुळे वाहन उद्योगावर आगामी वर्षात अवकळा येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. फिच रेटिंग्जच्या पाहणीमध्ये जगभरात २०२४ मध्ये वाहनांच्या विक्रीवर मंदी येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे जगभरातील कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
भारतातच नाही तर जगभरातील बड्या कंपन्यांना गेल्या काही काळापासून विक्रीमध्ये मंदीचा सामना करावा लागला होता. यामुळेच फोर्ड सारख्या कंपन्यांनी अनेक बाजारपेठांतून काढता पाय घेतला होता. कोरोना आणि प्रदुषणामुळे प्रतिबंध अशी अनेक कारणे होती. त्यातच कंपन्यांना गॅसोलिनमधून स्विच होऊन ईलेक्ट्रीकचा पर्याय निवडावा लागत आहे. या साऱ्या संकटांत आता कंपन्यांना आर्थिक कारणांमुळे पुन्हा एकदा विक्रीतील मंदीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
एवढी संकटे असली तरीही मजबूत ताळेबंदामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील कार निर्मात्यांच्या लवचिकतेबद्दल आशावाद दर्शविला आहे. प्रवासी वाहनांच्या जागतिक विक्रीत 2024 मध्ये वाढ मंदावणार असल्याचे फिंचने म्हटले आहे. आर्थिक मंदी आणि वाढलेले व्याजदर यामुळे हा परिणाम होणार असल्याचे यात म्हटले आहे.
असे असले तरी ऑटो कंपन्यांना एक क्षेत्र खूप दिलासा देणार आहे. ग्रीन आणि क्लीन पॉवरट्रेन असलेल्या वाहनांसह नवीन ऊर्जा वाहनांच्या विक्रीत वाढ होईल असा अंदाज फिंचने दिला आहे. या सेगमेंटमध्ये मोठी वाढ होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हा फायदा ईव्ही विक्रीसाठी एकत्रितपणे स्थानिक आणि जागतिक कंपन्यांनी एकत्र प्रयत्न केलेल्या कंपन्यांना होणार आहे.