ओला ईलेक्ट्रीक स्कूटर जेव्हा आली तेव्हापासून सतत काही ना काही समस्या देत आहे. अनेकांच्या स्कूटर आतापर्यंत किती वेळा नादुरुस्त झाल्या असतील याला मोजमाप नाहीय. ओलाच्या या हायफाय ईलेक्ट्रीक स्कूटरला रेंज चांगली मिळतेय, तसेच फिचर्सही चांगले आहेत, यामुळे मागणी वाढतेय. परंतू, ग्राहकांना विक्री पश्चात सेवा देण्यास ओला सपशेल अपयशी ठरत आहे. नुकताच कोल्हापुरच्या इचलकरंजीमध्ये ओलाला दणका देणारा प्रकार घडला आहे.
इचलकरंजी भागातील ओला स्कूटर घेतलेल्या लोकांनी कंपनी विक्रीनंतर सेवाच पुरवत नसल्यावरून नाराज होत ओलाचे एक्सपिरिअंस सेंटरचे शटर बंद केले आहे. तसेच कंपनीकडे चांगली सेवा देण्याची मागणी केली आहे. हा अनुभव देशभरात विविध शहरांत येत आहे. ओला ग्राहकांकडून विविध प्लॅन जाहीर करून पैसे घेत आहे, परंतू प्रत्यक्षात तशी सेवा देत नसल्याने ग्राहक नाराज आहेत.
जेव्हा ग्राहक एखाद्या उत्पादनासाठी पैसे मोजतात, तेव्हा ते केवळ दर्जेदार उत्पादनाचीच अपेक्षा करत नाहीत तर विक्रीनंतरची विश्वासार्ह सेवा देखील पाहतात. इचलकरंजीतील ओलाच्या ग्राहकांना सेवाच मिळत नसल्याने ते संतप्त झाले आहे. इतर शहरातील ओला स्कूटर मालकांनी सोशल मीडियावर अशाच समस्या मांडल्या आहेत. ओला घरी सर्व्हिस देण्याचे आश्वासन देत आहे, कमी खर्चात दुरुस्ती करण्यासाठी, मेन्टेनन्स करण्यासाठी पैसेही घेत आहे. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा बिघाड होतो तेव्हा ओलाची सेवा कुठेच नसते, असा अनुभव या ग्राहकांना येत आहे.
इचलकरंजीच्या ग्राहकांनी ओलाने सेवा सुधारावी नाहीतर या भागातील विक्री आणि सेवाच बंद करावी अशी मागणी केली आहे. ओलाची स्कूटर एकदा का दुरुस्तीला टाकली की ती परत कधी मिळेल याचा नेम नाही, पार्ट अव्हेलेबल नाहीत, समस्यांवर काहीच उपाययोजना नाही, केअर+ प्लॅन घेतला तरी त्याचा लाभ नाही, रोडसाइड असिस्टन्स (RSA) साठी पैसे मोजले तरी तो मिळत नाही अशा तक्रारी या ग्राहकांच्या आहेत.