आज मिळेल, उद्या मिळेल असे गेले चार महिने झुलवत ठेवल्यानंतर ओला कंपनीने इलेक्ट्रीक स्कूटरची डिलिव्हरी कधी पासून सुरु केली जाईल याची तारीख जाहीर केली आहे. Ola Electric scooter S1 आणि Ola Electric scooter S1 Pro याची डिलिव्हरी डेट कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट केली आहे. यामुळे आता ओलाच्या स्कूटर डिसेंबर महिन्यात रस्त्यावर दिसू लागणार आहेत.
शनिवारी अग्रवाल यांनी ही मोठी अपडेट दिली आहे. ओलाने दोनदा ग्राहकांना दिलेली तारीख पुढे ढकलली होती. परंतू आता कंपनीने उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु केले आहे. यामुळे ही स्कूटर येत्या 15 डिसेंबरपासून डिलिव्हर होण्यास सुरुवात होईल असे भाविश म्हणाले.
ओला इलेक्ट्रीकने 15 ऑगस्टला स्कूटर लाँच करताना पहिली बॅच 25 ऑक्टोबर आणि 25 नोव्हेंबर दरम्यान डिलिव्हर केली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, ज्या ग्राहकांनी ही स्कूटर बुक केली होती, त्यांना कंपनीने मेल पाठवून डिलिव्हरीसाठी उशीर होणार असल्याचे कळविले होते. तसेच हा विलंब टाळता येणारा नाही असेही कंपनीने म्हटले होते. महत्वाचे म्हणजे कंपनी ग्राहकांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नव्हती.
यामुळे जवळपास 4 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आता हळूहळू या स्कूटर ग्राहकांच्या घरी डिलिव्हर होण्यास सुरुवात होणार आहे. गेल्या आठवड्यात ओलाच्या क्वालिटी मॅनेजरने तडकाफडकी राजीनामा दिला होता. यामुळे ओलाच्या स्कूटरमध्ये काहीतरी समस्या असल्याचे बोलले जात होते. कंपनीही काही सांगत नव्हती. आता कंपनीने ग्राहकांना 15 डिसेंबर ते 30 डिसेंबर या काळात स्कूटर डिलिव्हर करण्याचे पुन्हा आश्वासन दिले आहे. आता या स्कूटर याच वेळेत डिलिव्हर होतात का हे देखील पहावे लागणार आहे.