रॉयल एन्फील्ड बुलेट आता खरोखरच रॉय़ल होऊ लागली आहे. कारण एकतर तिचे मायलेज एवढे कमी की सध्याच्या पेट्रोलच्या दरात ती परवडणार नाही आणि तिची किंमतही एवढी जास्त की नवीन घ्यायला दीड-दोन लाख तरी गाठीशी हवेत. तरी देखील ही दणकट बाईक लाखो लोकांच्या मनात आहे. कंपनीने काळानुसार या बाईकमध्ये बदल केले तरी तिचा मुळ लूक तसाच राहील याची काळजी घेतली आहे.
सोशल मीडियावर रॉयल एन्फील्ड बुलेटचे एक खरेदीचे बिल व्हायरल होत आहे. या बिलावरील रक्कम पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. अर्थात तेव्हा पेट्रोलही काही रुपयांना मिळत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. १९८६ मध्ये एका व्यक्तीने बुलेट खरेदी केली होती, जुनी कागदपत्रे चाळत असताना त्याला हे बिल सापडले आहे. जुन्या दिवसांत रमताना त्याने आजची बुलेटची किंमत पाहिली आणि तेव्हाची किंमत पाहून डोक्यावर हात मारून घेतला आहे.
या बिलातील बुलेटची ऑनरोड किंमत 18,700 रुपये आहे. तर आज तब्बल दहा पटींनी बुलेटची किंमत वाढलेली आहे. हे बिल ३६ वर्षे जुने आहे. रॉयल एनफील्ड Bullet 350 Standard मॉडेलचे हे बिल झारखंडच्या संदीप ऑटो कंपनीने जारी केले होते.
1986 मध्ये रॉयल एनफील्ड बुलेटला फक्त एनफील्ड बुलेट म्हटले जात होते. तेव्हाही ही बाईक खूप लोकप्रिय होती आणि एक विश्वासार्ह मोटारसायकल मानली जायची. भारतीय सैन्यात या बुलेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता.