रेनॉची छोटीशी परंतू मस्क्युलर लुक वाली कार क्विड देशातील सर्वात लोकप्रिय युज्ड कार ठरली आहे. वापरलेल्या कार विकणाऱ्या व विकत घेणारी कंपनी स्पिनीने यासंबंधी माहिती दिली आहे. स्पिनीने २०२३ च्या पहिल्या तिमाहीचा अहवाल जारी केला, यामध्ये क्विडला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे म्हटले आहे.
रेनॉ क्विडला देशभरातील युज्ड कार खरेदीदारांकडून मोठ्या प्रमाणात पसंती व मागणी मिळाली आहे. सेकंड हँड कार खरेदी करणाऱ्या एकूण खरेदीदारांपैकी 65% ग्राहक हे प्रथमच कार खरेदी करणारे आहेत. गेल्या वर्षी त्यांची संख्या ही ६० टक्के होती.
क्विड पाठोपाठ ह्युंदाई क्रेटा, मारुतीच्या बलेनोलाही ग्राहकांनी मोठी मागणी नोंदविली आहे. तर मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि होंडा तीन ब्रँडना सर्वाधिक पसंती मिळाली. खरेदीदारांमध्ये सिल्व्हर हा कारचा सर्वाधिक पसंतीचा रंग होता, त्यानंतर अनुक्रमे ग्रे आणि लाल होते. स्पिनी खरेदीदारांसाठी हॅचबॅक हा सर्वात पसंतीचा पर्याय राहिला असला तरी, कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी वाढत असल्याचे दिसले आहे.
क्विडमध्ये असे काय...क्विडचे आजवर ४.४ लाखांहून अधिक युनिट विक्री झालेले आहेत. एसयूव्ही-इन्स्पायर्ड या कारमध्ये १८४ मिमीचे ग्राऊंड क्लीअरन्स व ड्युअल टोन लुक ग्राहकांना भावत आहे. ८ इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, अँड्रॉईड ऑटो, अॅप्पल कारप्ले, व्हिडिओ प्लेबॅक, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल, सिल्व्हर स्ट्रीक एलईडी डीआरएल कारला प्रिमिअम लूक देतात. तसेच इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ड्युअल फ्रण्ट एअरबॅग्ज, एबीएससह ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देते.