सध्या भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात टाटा मोटर्सची जवळपास 80 टक्के भागीदारी आहे. तर, मारुती सुझुकी, महिंद्रा आणि ह्युंदाईची स्थिती फारशी चांगली नाही. कुणाकडेही कमी किंमतीची इलेक्ट्रिक कार नाही. यातील मारुती सुझुकीकडेतर एकही इलेक्ट्रिक कार नाही. महिंद्रा एक इलेक्ट्रिक कार याच महिन्यात लॉन्च करणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, तिची किंमत 15 लाख रुपयांपेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.
याशिवाय, सध्या ह्युंदाईच्या इलेक्ट्रिक कारची किंमतही 20 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. अर्थात यांपैकी कुठल्याही कंपनीकडे, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची इलेक्ट्रिक कार नाही. मात्र, आता टाटा एक नवी इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना आखत आहे. या कारची किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.
टाटा मोटर्स आपला इलेक्ट्रिक वाहनांचा पोर्टफोलिओ बळकट करण्यासंदर्भात काम करत आहे. यासाठी टाटा आपल्या पंच मायक्रो एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करू शकते. यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची ठोस माहिती समोर आलेली नाही. पण माध्यमांतील वृत्तांनुसार, टाटा पंचचे प्रोडक्शन जून महिन्यात सुरू केले जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे, रेग्युलर टाटा पंच लॉन्च करून अद्याप एकच वर्ष झाले आहे. तसेच एवढ्या कमी काळात कंपनीने हिचे तब्बल एक लाखहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे.
आगामी टाटा पंच ईव्हीच्या पॉवरट्रेनची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, माध्यमांतील वत्तांनुसार, पंच इलेक्ट्रिक 26kWh (टियागो ईव्हीकडून घेण्यात अलेले ) आणि 30.2kWh (नेक्सन ईव्हीकडून घेण्यात आलेले) बॅटरी पॅक ऑप्शनसह सादर केली जाऊ शकते.