देशातील अनेक भाग असे आहेत जिथे कार कंपन्यांचे शोरुम तर आहेत परंतु त्यांच्याकडे टेस्ट ड्राईव्हसाठी कार नाहीत. मारुतीसारख्या कंपन्यांच्या शोरुममध्ये ही अवस्था आहे. तरीही लोक डोळे बंद करून कार विकत घेतात. तसे करू नका, कोणतीही कार वाईट नसते परंतु आपल्या गरजेनुसार, वापरानुसार त्यामध्ये प्लस मायनस असू शकतात. सीएनजी कार कधीही न चालविता लोक त्या कार घेतात आणि नंतर पिकअप नाही, सामान ठेवायला जागा नाही अशी बोंब मारत बसतात.
कार खरेदी करण्यापूर्वी जर तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतली तर अनेक त्रासापासून सुटका करून घेता येते. यासाठी टेस्ट ड्राईव्ह घेताना काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. त्या गोष्टी कोणत्या, एकदा पहा म्हणजे तुम्हाला नंतर पश्चाताप होणार नाही.
नवीन कार खरेदी करण्यापूर्वी त्या सेगमेंटमधील इतर पर्यायांचाही विचार केला पाहिजे. यासोबतच तुमच्यासाठी कोणती कार अधिक चांगली असेल याचे अनेक मुद्देही तुम्हाला माहीत असले पाहिजेत. असे केल्याने अनेक पर्यायांमधून एक चांगला पर्याय निवडणे सोपे होते.
तुम्ही शहरात राहत असाल आणि शहरातच चालविणार असाल तर त्यासाठी किंवा डोंगरभागात राहणार असाल, रस्ते खराब असतील किंवा ग्रामीण भागात राहणार असाल तर त्याप्रमाणे तुमच्या वापरानुसार कार निवडावी. कोणतीही कार बुक करण्यापूर्वी त्याची टेस्ट ड्राईव्ह घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही दोन-तीन पर्याय निवडले की, टेस्ट ड्राइव्ह घेऊन तुमच्यासाठी कोणता पर्याय अधिक चांगला आहे हे ठरवणे सोपे जाते.
तुमच्या माहितीसाठी टोयोटाच्या इटिऑस लिवा या कारसाठी तेव्हा पन्नास हजाराहून अधिक बुकिंग झाली होती. परंतु जेव्हा ती कार लाँच झाली तेव्हा तिचा लुक पाहून हजारो लोकांनी तिची बुकिंग रद्द केली. नंतर ती कार बहुतांश टॅक्सीसारख्या वापरासाठी घेतली गेली. ती कार खरोखरच चांगली होती, परंतु या दोन कारणांनी त्या कारकडे कोणी वळेना, अखेर कंपनीने ती बंद करून टाकली. ह्युंदाईच्या सेल्समनने नवी सँट्रो आलेली तेव्हा पंप बॉश कंपनीचा असल्याचा तुक्का एका ग्राहकाला हाणला होता, त्याने बॉनेट उघडून कंपनी पाहिली तर वेगळीच निघाली होती. यामुळे या सेल्समनवर देखील विश्वास ठेवू नका. कार विकल्यानंतर तुमचा आणि त्यांचा काहीही संबंध राहत नाही. काही समस्या असतील तर तुम्हाला सर्व्हिस सेंटर गाठावे लागतात. ते परत दुसऱ्यांना गोड गोड बोलून गिऱ्हाईक करण्यात व्यस्त होतात.
जेव्हा तुम्ही कारच्या टेस्ट ड्राईव्हसाठी जाल तेव्हा एकट्याने जाऊ नका. सोबत मित्र, कुटुंबीय अशा लोकांना घेऊन जा. म्हणजे कारचे सस्पेंशन, पिकअप आदीची माहिती मिळेल. तुम्ही मागेही बसून पाहू शकता. तुम्ही सर्व वैशिष्ट्यांची माहिती मिळवा. त्यांची उपयुक्तता देखील समजू शकेल.
गाड्यांची टेस्ट ड्राइव्ह घेतल्यानंतर सर्व माहिती गोळा करा. त्यानंतरच कोणती कार घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल हे ठरवा. त्यासाठी तुम्ही त्या कारचे फेसबुकवरील ग्रुप जॉईन करा, तिथे त्या कारचे प्लस मायनस, सर्वांनाच येणारे कॉमन प्रॉब्लेम तुमच्या लक्षात येतील. यानंतर बजेट, फीचर्स, सेफ्टी इत्यादी बाबींचा विचार करूनच कार बुक करा. फायद्यात रहाल.