Yulu vs Kinetic Green Zulu Electric Scooter: “नावात काय ठेवलंय?” असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण उद्योग क्षेत्रात नावालाच जास्त महत्व आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी कायनेटिक ग्रीन एनर्जीने डिसेंबर 2023 मध्ये झुलू (Zulu) नावाची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. आता बंगळुरुमधील EV कंपनी युलूला (Yulu) याची माहिती मिळाल्यावर त्यांनी कायनेटिकविरोधात गुन्हा दाखल केला. युलूचा आरोप आहे की, कायनेटिकने ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन करत 'झुलु' नावाचा वापर केला आहे, जो युलू या नावासारखाच आहे.
युलू बाइक्स या भारतातील सर्वात मोठ्या शेअर इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीने बंगळुरू येथील व्यावसायिक न्यायालयात खटला दाखल केला आहे. ट्रेडमार्क नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायनेटिक ग्रीन विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, युलूला बजाज ऑटो आणि मॅग्ना सारख्या कंपन्यांकडून 160 कोटी रुपयांचा निधी मिळाला असताना, ही याचिका दाखल झाली आहे.
झुलू-युलू नावाचा गोंधळयुलूने या वर्षी जानेवारीमध्ये केस दाखल केली होती. युलूचे म्हणने आहे की, झुलू ब्रँड आमच्या ब्रँडसारखाच आहे. नावामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. तर, कायनेटिक ग्रीनने ऑटोकार इंडिया प्रोफेशनलला सांगितले की, त्यांनी 26 सप्टेंबर 2022 रोजी झुलूचा ट्रेडमार्क नोंदणीकृत केला आहे. कायनेटिकच्या म्हणण्यानुसार, कंपनीने नोंदणीनंतरच झुलू नाव वापरण्यास सुरुवात केली.
कायनेटिकला हायकोर्टातून झटका कनिष्ठ न्यायालयाने युलूच्या दाव्यावर तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने कायनेटिक ग्रीन एनर्जीला आपली बाजू मांडण्याची परवानगी दिली. यानंतर युलूने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. 5 फेब्रुवारी रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने युलूला तात्पुरता दिलासा दिला आणि कायनेटिक ग्रीनला झुलू, युलू किंवा तत्सम ट्रेडमार्क वापरण्यापासून प्रतिबंध केला. कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणी 11 मार्च 2024 पर्यंत अंतिम आदेश जारी करण्याचे आदेश व्यावसायिक न्यायालयाला दिले.