विनय उपासनी -मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनामुळे रस्ते अपघातांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एनसीआरबी अहवालात दर १०० किमी अंतरावर ४० जण रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत असल्याचे भयावह चित्र समोर आले होते. बहुतांश अपघात चालकाला वेगावर नियंत्रण करता न आल्याने, तसेच धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याने झाल्याचे या अहवालात अधोरेखित झाले. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षित ड्रायव्हिंग, वाहनाची सुरक्षा मानके, वाहतुकीच्या नियमांचे पालन वगैरेंचा घेतलेला आढावा...
सीट बेल्ट लावलाच नाही तर काय?- अपघाताच्या वेळी वाहनाच्या मागील सीटवर बसलेली व्यक्ती ४० पट वेगाने फेकली जाते. - अशा वेळी एअर बॅग्ज कुचकामी ठरतात. - या मोक्याच्या आणि धोक्याच्या क्षणीच सीट बेल्ट महत्त्वाची भूमिका बजावतो. - गाडीच्या पुढील भागात बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावला असेल आणि मागच्या व्यक्तीने लावला नसेल, तर मागचा प्रवासी ४० पट वेगाने त्याच्यावर कोसळण्याचा धोका असतो. याकरिता सीट बेल्ट लावणे महत्त्वाचे ठरते.
सीट बेल्ट लावणे अगत्याचे -- सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. - कोणत्याही वाहनात आतील प्रवाशांच्या जिवाची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षा पुरविलेली असते. - सीट बेल्ट, एअर बॅग्ज, हँड ब्रेक, इमर्जन्सी ब्रेक ही त्यातली काही ठळक उदाहरणे.- सर्वसाधारण समज असा की, सीट बेल्ट फक्त पुढे बसलेल्या प्रवाशानेच लावायचा असतो. मागील सीटवर बसलेल्या प्रवाशाने तो लावला नाही, तरी चालतो. - हा समज अत्यंत चुकीचा आहे. वाहनात बसलेल्या प्रत्येक प्रवाशाने सीट बेल्ट लावणे अगत्याचे आहे.
क्रॅश टेस्टिंगवर रेटिंग -एन कॅप रेटिंग ही अलीकडच्या काळातील संकल्पना आहे. ब्रिटनमधील ग्लोबल एन कॅप ही एक वैश्विक संस्था आहे. या ठिकाणी गाडीची क्रॅश टेस्टिंग केली जाते. ६० ते ६५ किमी प्रतितास वेगाने गाडीची गती साधत ती क्रॅश केली जाते. त्यातून होणाऱ्या मानवी इजांना अनुसरून गाड्यांच्या एन कॅप स्कोअर काढला जातो. भारतातील गाड्यांना आता एन कॅप रेटिंग दिले जाते.
आलिशान गाड्यांतील सुरक्षा फीचर्स -- आधुनिक गाड्यांमध्ये काही खास फीचर्स असतात, जे कार्यान्वित केले की गाडी आपोआप थांबते वा सुरू हाेते. - समोर असलेल्या गाडीचा वेग कमी झाल्यास आपल्या गाडीचाही वेग कमी होतो.
- ड्रायव्हरला झोप लागत असेल किंवा पेंग आली, तर वॉर्निंग बीप वाजते. - रस्त्यालगत असलेल्या गाइडलाइन्सनुसार गाडी आपोआप वळते. - सहा एअर बॅग्ज, सेन्सर्स, गाडीचा वेग नियंत्रित करण्यासाठी ऑटो लॉक.
केवळ गाडीत सुरक्षेचे अनेक फीचर्स असून उपयोग नाही. त्यांचा तंतोतंत वापर गाडीतील प्रवासी करतात का, हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्याकडे नेमकी याचीच वानवा आहे, तसेच वाहतुकीचे नियम पाळताना आपण भारतीय खूपच बेफिकीर असतो. या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. विशेषत: अवजड वाहनांनी वाहतुकीचे नियम काटेकोर पाळणे आवश्यक आहे. कारण त्यांनी एखाद्या छोट्या कारला धडक दिली, तर त्यांचे फारसे नुकसान होत नाही. - समीर ओक, ऑटो एक्सपर्ट.