नवी दिल्ली : नव्या वाहतूक नियमांमुळे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. मात्र, पोलिस या नियमांपासून फार आधीपासूनच वेगळे होते. त्यांना विचारणार कोण आणि दंड करणार कोण? जाब विचारल्यास सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा असे प्रकार होत होते. त्यामुळे नको ती कटकट, असे म्हणत वाहतुकीचे नियम पाळण्यातच धन्यता मानली जात होती. पण आता दिवस बदलले आहेत. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पोलिसांच्याही पावत्या फाटू लागल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नव्या नियमांमुळे कोणाला 23 हजार तर कोणाला 70 हजार पर्यंत दंड झाल्याचे वाचायला मिळत आहे. यामुळे आरटीओ, पीयुसी, इन्शुरन्स कंपन्यांकडे गर्दी होऊ लागली आहे. अहमदाबाद आणि चंदीगढच्या पोलिस प्रशासनाने तर कायद्याचे रक्षक असलेल्या खात्यातील पोलिसांनाही दणका देण्यास सुरूवात केली आहे.
बऱ्याचदा रस्त्याने जाताना पोलिस विरुद्ध दिशेने, ट्रिपल सीट, हेल्मेट न घालता दुचाकी चालविताना, सीटबेल्ट न लावता कार चालविताना दिसतात. त्यांच्या वाहनांची पीयुसी, इन्शुरन्स, कागदपत्रे आहेत का हे देखील कोणी विचारू शकत नाही. नाक्या नाक्यावर तपासणीसाठी असलेले पोलिसही त्यांच्या ओळखीचे असतात किंवा थांबविल्यास पोलिस असल्याचे सांगितल्याने त्यांना सोडून दिले जाते. यामुळे कायद्याच्या रक्षकांकडूनच कायद्याचे पालन होत नव्हते. सध्या सोशल मिडीयाचा काळ असल्याने याबाबतची खदखद कधी व्हिडीओ, कधी फोटो, कमेंटमधून व्यक्त होत आहे. यामुळे पोलिस प्रशासनानेच याची दखल घेतली आहे.
वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पोलिसांना धडा शिकविण्यासाठी सध्यातरी अहमदाबाद आणि चंदीगड पोलिसांनी कंबर कसली आहे. तर उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या दोन पोलिसांना वाहतुकीचे नियम तोडल्याबद्दल दंड भरावा लागला आहे. पोलिस अधिक्षक आदित्य वर्मा यांनी सोमवारी सांगितले की, एका पोलिस कॉन्स्टेबलने हेल्मेट घातलेले नव्हते. तर दुसऱ्याकडे हेम्लेट आणि इन्शुरन्सचे पेपरही नव्हते. यामुळे पहिल्याला 500 रुपये आणि दुसऱ्याला 5800 रुपयांचा दंड भरावा लागला.
सध्या फारच कमी राज्यांनी नवीन नियम लागू केले आहेत. महाराष्ट्रासह पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांमध्ये हे नियम लागू झालेले नाहीत. तर गुजरातमध्ये आरटीओकडून सहकार्य मिळाल्यानंतरच नवीन नियम लागू होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारने हे नियम सर्व राज्यांना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.