मुंबई - कार खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक जण तिच्या रंगाला प्राधान्य देतो. कुणाला पांढऱ्या रंगाची कार आवडते, तर कुणाला गडद रंगाच्या कार अधिक आवडतात. पण काळ्या रंगाच्या कारना अपघात होण्याचा धोका अधिक असतो, असं तुम्हाला कुणीतरी सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का. तुम्ही प्रश्न कराल की, या मागे काय तर्क आहे?
तर वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिकच्या रिपोर्टनुसार काळ्या रंगाच्या कारला क्रॅश होण्याचा ४७ टक्क्यांहून अधिक असतो. तर करड्या रंगाच्या कारला ११ टक्के, चंदेरी रंगाच्या कारला १० टक्के आणि निळ्या व लाल रंगाच्या कारला क्रॅश होण्याचा धोका प्रत्येकी ७-७ टक्के असतो. वर्ल्ड ऑफ स्टॅस्टेस्टिकने आपल्या ट्विटर हँडलवर या रिपोर्टबाबत माहिती दिली आहे.
त्याशिवाय कुठल्या रंगाच्या कारला अपघात होण्याचा सर्वात कमी धोका आहे, याबाबतही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पांढऱ्या रंगाच्या कारला वरचं स्थान देण्यात आलं आहे. त्यानंतर पिवळ्या, नारिंगी आणि सोनेरी रंगाच्या कारचा समावेश आहे.
महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी हे आकडे फेटाळून लावताना लिहिले की, अशा प्रकारच्या खोटेपणाने मला विचार करण्यास भाग पाडले आहे. काहीही..., असं म्हणत त्यांनी त्यांचा या रिपोर्टवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आम्हीही (लोकमत) या रिपोर्टला दुजोरा देत नाही. मात्र जगभरात पांढऱ्या रंगाच्या कारच अधिक वापरल्या जातात. भारतामध्येही पहिली कार घेणाऱ्यां १० जणांपैकी ४ जण हे पांढऱ्या रंगाचीच कार खरेदी करतात.