नवी दिल्ली : सरकारने दिलेले प्रोत्साहन, जाहीर केलेल्या विविध सवलती यामुळे जगभरातील दिग्गज कंपन्या भारतात ईव्ही प्रकल्प सुरू करीत आहेत. या वाहनांमध्ये लागणाऱ्या बॅटरी स्वस्त झाल्याने उत्तरोत्तर ही स्वस्त होणार आहेत.
प्रदूषणमुक्त प्रवास यापुढे परवडणाऱ्या खर्चात शक्य असल्याने लोकांचा कल ईव्ही कार घेण्याकडे असणार आहे. यामुळे मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा अँड महिंद्रा तसेच टाटा मोटर्ससारख्या मोठ्या कंपन्या या वर्षात विविध प्रकारातील ईव्ही मॉडेल बाजारात आणणार आहेत. स्वत:च्या मालकीची कार असावी, असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसमोर यंदा अनेक पर्याय उपलब्ध असतील. (वृत्तसंस्था)
मर्सिडिज बेंझ : तीन नव्या बीईव्ही आणणारलक्झरी वाहन कंपनी मर्सिडिज बेंझ इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, २०२४ मध्ये कंपनी बाजारात १२ नव्या गाड्या सादर करणार आहे. यात तीन बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा (बीईव्ही) समावेश असेल.
महिंद्रा : वाटा ३० टक्के पर्यंत नेण्याचा संकल्पमहिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोलागुंटा यांनी सांगितले की, कंपनी पुढील पाच वर्षात बाजारात ई वाहने लाँच करणार आहे. जानेवारी २०२५ पासून कंपनीचे हे अभियान सुरू होईल. इलेक्ट्रिक एसयूव्हीची अभिनव मॉडेल्स कंपनी आणणार आहे. २०२७ पर्यंत इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात आमच्या कंपनीचा हिस्सा २० ते ३० टक्के असेल, या उद्देशाने आम्ही प्रयत्न करीत आहोत.
मारुती सुझुकी : ६ नवी मॉडेल्स मारुती सुझुकीचे कॉर्पोरेट विभागाचे कार्यकारी अधिकारी राहुल भारती यांनी सांगितले की, पुढील सात ते आठ वर्षात कंपनी ६ इलेक्ट्रिक वाहने लाँच करणार आहे. आता हायब्रीड इलेक्ट्रिक, सीएनजी, बायो-सीएनजी, इथेनॉल, इथेनॉल फ्लेक्स फ्युअल आदींना महत्त्व येईल. कंपनी या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणार आहे.
टाटा मोटर्स : चार नवी मॉडेल्स लाँच करणारटाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, २०२६ पर्यंत कंपनीच्या बाजारातील ई वाहनांची संख्या १० वर पोहोचली असेल. कंपनी कर्व आणि हॅरिअर ईव्हीसह आणखी चार मॉडेल्स आणण्याच्या विचारात आहे. कंपनीने सध्याही ईव्हीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध करून दिलेले आहेत.
ह्युंदाई : २६ हजार कोटींचा प्रकल्प ह्युंदाई मोटर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग यांना सांगितले की, मागच्या वर्षी प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही आयओएनआयक्यू-५ सादर केली होती. आम्हाला विश्वास आहे की, २०३० पर्यंत बाजारात ईव्हींचा वाटा जवळपास २० टक्के इतका असेल. पुढील १० वर्षात कंपनी तामिळनाडूमधील प्रकल्पात २६ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या ठिकाणी बॅटरी असेम्ब्लिंगचे युनिटही असणार आहे.