नवी दिल्ली : देशभरामध्ये 2030 पर्यंत 10 हजार सीएनजी गॅस पंप सुरु करण्यात येणार आहेत. खुद्द पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीच याबाबत घोषणा केली आहे. सध्या वेगळे असे सीएनजी पंप नसून आधीच्या पेट्रोल पंपावरच जागा करून सीएनजी पंप आणि टाक्या बसविण्यात येत आहेत. सध्या भारतात एकूण 1,424 सीएनजी पंप आहेत. या ठिकाणी सीएनजी भरताना आतील प्रवाशांना बाहेर येण्यास सांगण्यात येते. तेथील कर्मचाऱ्यांना विचारल्यास वेगवेगळी कारणे ऐकायला मिऴतात. यापैकी खरे कारण कोणते?
खरे म्हणजे सीएनजी भरताना गाडीतून उतरण्यास सांगण्यात येते, याची दोन कारणे आहेत. याचे पहिले कारण म्हणजे, भारतात फॅक्टरीफिटेड सीएनजी किट असणारी कमी वाहने आहेत. यामुळे बऱ्याच गाड्यांच्या बॉनेटखाली गॅस भरण्यासाठीचे नोझल असते. सीएनजी भरताना हे बॉनेट उघडले जाते. यामुळे प्रवाशांना पुढील काही दिसत नाही. अशावेळी एखादी दुर्घटना घडल्यास सुरक्षा म्हणून त्यांना खाली उतरवले जाते.
दुसरे कारण म्हणजे, सीएनजी भरत असताना सिलिंडर फुटण्याची शक्यता असते. यामुळे यावेळी दुर्घटना घडल्यास कारच्या बाहेर असणाऱ्या लोकांना बचावासाठी पळण्यास मिळू शकते.
पेट्रोल, डिझेल....पेट्रोल, डिझेल भरताना प्रवाशांनी कारबाहेर उतरण्याची गरज नाही. तर चालकाने उतरवे. याचे दोन फायदे आहेत. पेट्रोल भरताना मीटरवर लक्ष ठेवता येते. काहीवेळा मीटरमध्ये हेराफेरी केली जाते. तसेच जर कोणतीही दुर्घटना घडत असल्यास आत बसलेल्या लोकांना चालक सावध करू शकतो.