मुंबई : उन्हाळा किंवा हिवाळ्याच्या तुलनेत कार किंवा बाईक घसरण्याच्या घटना पावसाळ्यात जास्त घडतात. याचसोबत टायर पंक्चर होण्याचा धोकाही वाढतो. उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे.
महाराष्ट्रात सरासरी 60 ते 70 दिवस पाऊस असतो. कोकणात तर जवळपास १०० दिवस पावसाचेच असतात. काहीवेळा दलदलीची जमीन किंवा रस्त्यांची निकृष्ट कामे यामुळे रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडलेले असतात. या खड्डयांमुळे आधीच वेग मंदावलेला असल्याने त्रस्त असलेले वाहनचालक टायर पंक्चर किंवा वाहन घसरल्यास आणखी अडचणीत सापडतात. प्रवासावेळी प्रत्येकदा पंक्चर काढणारा भेटेलच असे नाही. या प्रकारांपासून वाचण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही टीप्स...
पावसाचे पाणी जेव्हा रस्त्यावर साचलेले असते, तेव्हा खडी निखळलेली असते. यावेळी वरून टायर जात असताना खडीचे छोटे छोटे अनुकुचिदार तुकडे टायरमध्ये घुसतात. यामुळे टायर पंक्चर होण्याची शक्यता असते. पाणी साचलेल्या रस्त्यावर टायरची ग्रिप कमी होते. यावेळी वेगात असल्यास व अचानक ब्रेक दाबल्यास टायर घसरतात. यामुळे बऱ्याचदा अपघातही होतात.
भारतीय रस्त्यांनुसार जास्तीत जास्त 80 किमीचा वेग असणे कायदेशीर आहे. तर एक्सप्रेस हायवेवर तो नुकताच १२० किमी करण्यात आला आहे. या वेगात गाडी नियंत्रणात राहते. यामुळे गाडी घसरण्याची किंवा टायर फुटण्याची शक्यता कमी होते.
टायरमध्ये हवा कमी-जास्त असल्यासही गाडी घसरू शकते. कार कंपनी जेवढा दाब सांगते तेवढा दाब ठेवल्यास आपण सुरक्षित राहतो. टायरचे प्रेशर पॅसेंजर, सामानानुसार बदलत असते. याबाबतची माहीती चालकाच्या दरवाजा उघडल्यावर दिसते.