कोरोना संकटाने सर्व कंपन्यांना ऑनलाईन काम आणि ऑनलाईन सेल (Online sale of cars) कसा होतो ते दाखवून दिले आहे. यामुळे अनेक कंपन्या खर्च वाचविण्यासाठी ऑनलाईन माध्यमाचाच वापर करण्याचा विचार करत आहेत. कार, स्कूटर सारख्या वस्तूंची खरेदीही लोक आता ऑनलाईन करू लागले आहेत. नवीन ट्रेंड पाहून जपानची कंपनी होंडाने आपल्या कार ऑनलाईन विकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे डीलरच्या भूमिकेवर संशय उपस्थित होऊ लागला आहे. आजवर डीलरच (car dealer) कारची विक्री करत होते. कंपन्यांच्या या पावलामुळे हळूहळू डीलरशीप बंद होण्याची शक्यता आहे.
होंडाने या महिन्यातच स्मार्टफोनद्वारे आपल्या पसंतीचे मॉडेल निवडणे, किंमत आणि खरेदी करण्याची सेवा सुरु केली आहे. होंडा ही पहिली कंपनी आहे जिने ही सेवा सुरु केली आहे. सध्या ही सेवा जपानच्या टोक्योमध्येच उपलब्ध करण्यात आली आहे. हळूहळू ही सेवा अन्यत्र देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले.
नव्या पिढीच्या ग्राहकांना लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल उचलले आहे. जे लोक डीलर्सकडे जाणे पसंत करत नाहीत त्यांच्यासाठी ही सेवा आहे. तरुणांमध्ये ऑनलाईन खरेदीची पसंती खूप मोठी आहे. अनेक तरुण ग्राहक डीलरकडे जाऊन तिथे मोलभाव करून कार खरेदी करू इच्छुक नाहीत. यामुळे ग्राहकांचा विचार बदलू लागल्याने कंपन्यांनाही आपला विचार बदलणे भाग पडत आहे.
वेबसाईट निक्कई आशियाने म्हटले की, होंडाच्या पाठोपाठ काही अन्य कंपन्या देखील ही ऑनलाईन विक्री सुरु करण्याच्या विचारात आहेत. यामध्ये निस्सान आणि टोयोटा या कंपन्यांचा समावेश आहे. निस्सान या हिवाळ्यात नवीन एसयुव्ही सादर करणार आहे. याची विक्री जपानमध्ये ऑनलाईन करण्यात येणार आहे. टोयोटाने फेब्रुवारीमध्येच अमेरिकेत अशाप्रकारची सेवा सुरु केली आहे. टेस्ला कंपनीने सुरुवातीला अशी सेवा दिली होती. या नव्या पर्यायामुळे कंपन्यांनी खर्च वाचविण्यासाठी डीलरशिप बंद करण्यास सुरुवात केली आहे.
ओलाने ठेवले पाऊलओलाने देखील भारतात ऑनलाईन स्कूटर विक्रीला सुरुवात केली आहे. यामुळे डीलरशिपवरील खर्च वाचणार असून त्याचा फायदा कंपनीला होणार आहे. यामध्ये मात्र, ग्राहकाचे नुकसान होणार आहे. कारण कंपनी आणि त्याच्यामध्ये मध्यस्थ कोणी नसल्याने डिस्काऊंट किंवा किंमतीमध्ये घासाघीस करण्याची संधी त्याला मिळणार नाही.