देशात स्वत:ची वाहन सुरक्षा रेटिंग एजन्सी सुरु झाली आहे. यापूर्वी भारतातील कार कंपन्या त्यांच्या कार किती सुरक्षित आहेत, हे ग्लोबल एनकॅपकडे पडताळून पाहत होत्या. यासाठी एका कारला अडीज कोटींची खर्च येत होता. तो आता ६० लाखांवर आला आहे. असे असले तरी आजवर भारतीय कारची क्रॅश टेस्ट करणाऱ्या GNCAPने मोठा निर्णय घेतला आहे.
जीएनकॅपने भारतात विकल्या जाणाऱ्या किंवा उत्पादित होणाऱ्या कोणत्याही कारची क्रॅश टेस्टिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२३ पासून भारतीय कंपन्यांच्या कारची सुरक्षा चाचणी करणे बंद केले जाणार आहे. ग्लोबल एनकॅपच्या सीईओंनी भारतात येऊन मारुतीला सुरक्षित कार बनविण्याचे आव्हान दिले होते. परंतू, वेळोवेळी मारुतीच्या कार फेल ठरल्या होत्या.
भारतात टाटा, स्कोडा, फोक्सवॅगन आणि महिंद्राच्याच कारना फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. टाटा ही पहिली फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळविणारी कंपनी आहे. ग्लोबल एनकॅप आणि भारतीय एनकॅपचे नियम, अटी, चाचणी वेगळी आहे. यामुळे दोन्ही रेटिंग एजन्सी वेगवेगळी सेफ्टी रेटिंग देतील आणि ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, या कारणास्तव जीएनकॅपने हा निर्णय घेतला आहे.
NCAP म्हणजे न्यू कार असेसमेंट प्रोग्राम. हा कार्यक्रम 1978 मध्ये वाहनांची चाचणी करणाऱ्या यूएसमधील कार क्रॅशबाबत ग्राहकांना जागरूक करण्यासाठी सुरू करण्यात आला होता. US-NCAP मॉडेलवर आधारित, क्रॅश चाचणी कार्यक्रम इतर देशांमध्ये देखील सुरू करण्यात आले होते, जे आज ऑस्ट्रेलियन NCAP, युरो NCAP, जपान NCAP, ASEAN NCAP, चायना NCAP, कोरियन NCAP आणि लॅटिन NCAP म्हणून ओळखले जातात.
GNCAPने 2013 पासून भारतीय कारसाठी सेफ कार्स फॉर इंडिया कार्यक्रम सुरू केला होता आणि जानेवारी 2014 मध्ये भारतात विकल्या गेलेल्या 5 प्रसिद्ध कारचा क्रॅश चाचणी अहवाल जगासमोर सादर केला होता. ही चाचणी प्रौढांसाठी 2013 लॅटिन NCAP मूल्यांकन प्रोटोकॉल आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी 2010 लॅटिन प्रोटोकॉलवर आधारित होती. तेव्हा सर्व कारना झिरो सेफ्टी रेटिंग मिळाली होती. आजही मारुतीच्या अनेक गाड्यांना झिरो रेटिंग मिळत आहे. जुन्या ब्रेझालाच फोर स्टार रेटिंग मिळाले आहे.