नवी दिल्ली : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी शिवसेनेने महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळग्रस्तांना भरीव मदत देण्यासाठी आंदोलन केले. तर काँग्रेसने काश्मीरच्या नेत्यांची गळचेपी केली जात असल्याविरोधत आंदोलन केले. या सगळ्या घडामो़डींमध्ये पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दिल्लीमध्ये सध्या हवा प्रदुषणाने डोके वर काढले आहे. न्यायालय, सरकारच्या प्रयत्नांनतरही हवेतील विषारी घटकांची मात्रा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. दिल्ली सरकार शेजारच्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना जबाबदार धरत आहे. शेतातील खोडवे तोडण्याऐवजी जाळण्यात येत असल्याने ही हवा प्रदूषित होत असल्याने न्यायालयानेही यावर निर्बंध आणले आहेत. याचबरोबर दिल्ली सरकारने वाहनांचा ऑड-इव्हन फॉर्म्युलाही वादाचा विषय ठरला होता. पुढील वर्षी निवडणुका असल्याने विरोधकांनीही हा मुद्दा लावून धरला होता.
या पार्श्वभुमीवर भाजपाचे खासदार आणि दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी हे सायकलवरून लोकसभेत दाखल झाले. तर गुजरातचे खासदार मनसुख मांडवियाही सायकलवरून लोकसभेच्या आवारात दाखल झाले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या कारमुळे प्रदूषण होते. यामुळे सरकार इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देत आहे. केंद्रीय पर्य़ावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ह्य़ुंदाईच्या इलेक्ट्रीक कारमधून लोकसभेच्या आवारात एन्ट्री केली.
प्रदूषण मुक्त असल्याने सरकार इलेक्ट्रीक वाहनांसाठी आग्रही आहे. लोकांनाही आवाहन आहे की त्यांनी प्रदूषणाविरोधात लढ्यामध्ये सहभागी व्हावे. सार्वजनिक सेवा, वीजेवर चालणारी वाहने वापरावीत, असा संदेश जावडेकर यांनी दिला.