टॅक्सी, रिक्षाच्या प्रतीक्षेत रोज उभे राहून राहून कंटाळा आला, अखेर ओला व उबेरचाही नवा पर्याय तयार झाला. पण तरीही मनाला राहून राहून खंत होतीच. ही खंत खूप आकर्षक होती, मनाला मोहवणारी होती. आपण आपली कार का घेऊ नये. किमान आपल्याला पाहिजे तेव्हा त्या कारने पाहिजे तेथे जाता येईल. कदाचित कार (car)ही एक जबाबदारी जरी असली तरी जीवनशैलीला साजेशी अशी घेता येऊ शकते. खिसा पाकिट सांभाळून व एक छोटे स्वप्न का होईना पूर्ण झाल्याचे समाधान तर मिळेल...
कार घेण्यामागचा काहीसा छोटेखानी विचार अगदीच वाईट नक्की नाही. आज कार घेऊ इच्छिणाऱ्या अनेकांकडे किमान स्वतःची कर्ज घेऊन का होईना एक जागा तयार झालेली असते. पहिले जीवनावश्यक असे घर व त्यातील सुखसुविधा घेतल्यानंतर कार घेण्याचा विचार करणे अगदीच काही वाईट नाही.. खरं म्हणजे वाढत्या वाहतुकीला आळा घालण्यात सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणावा तितका सुखकरही राहिलेला नाही, टॅक्सी, रिक्षा वा अगदी कुबेर, ओला सारख्या रेडिओ टॅक्सीच्या सुविधा असलेल्या मोटारींचा वापर करण्यामध्येही अनेक बंधने आहेतच. प्रवासावरचा रोजचा खर्च होणार आहे तो होतच आहे, मग स्वतःची कार असायला हवी, असा विचार मनात आला तर काय चुकले? वाहतूक कोंडीची समस्या , त्यामुळे होणारा वेळेचे अपव्यय, रिक्षा, टॅक्सी मिळवताना होणारा जीवाचा आटापिटा हा देखील कोंडीत अडकल्यावर ओलामध्ये मागे बसल्यानंतर होणाऱ्या मनस्तापाइतकाच वाटतो. मुळात शहरी जीवनात ही वाहतूककोंडी आता पाचवीलाच पूजल्यासारखी झाली आहे. तेव्हा कार घ्यायची असा विचार खिसा सांभाळून करायला काहीच हरकत नाही. फक्त त्यासाठी काही प्रश्नांची उत्तरे स्वतःलाच सोडवावी लागतात. प्रश्न साधेसोपेच आहेत.
पार्किंगला जागा आहे का व किती आहे ? हॅचबॅक (hatchback), सेदान (sedan)की एसयूव्ही (SUV) कोणत्या प्रकारची कार आवश्यक वाटते ? कारचा वापर जास्त कुठे करणार ; शहरात, की शहराबाहेर ? कार तुमची तेव्हा कारसाठी किती वेळ देऊ शकणार? ड्रायव्हिंगचा आनंद घेणार की शोफरचा ? तुमच्या घराजवळ तुम्ही घेणार त्या कारच्या कंपनीचे सर्व्हिंस सेंटर आहे की लांब आहे, जवळपास विश्वासू गॅरेजही आहे का? कारसाठी अतिरिक्त रक्कम बाजूला काढून ठेवता येईल का? कार घेताना प्राधान्य कशाला रंग, रूप की गुण? या प्रश्नांची उकल केली, की तुमचेच तुम्हाला सारे काही समजेल हे नक्की...