जगातील सर्वात लहान कार Peel P50. या कारची लांबी फक्त 134 सेंटीमीटर (4.3 फूट) आहे. तर पेट्रोल टाकी फक्त 5 लीटर आहे. कारच्या मालकाचे म्हणणे आहे की, छोट्या कारमुळे लोक त्यांची चेष्टा करतात, पण या कारमधून खूप मोठी बचत होते. अॅलेक्स ऑर्चिन असे कारच्या मालकाचे नाव आहे. ते 31 वर्षांचे आहेत. ब्रिटनमधील ससेक्स शहरात दैनंदिन कामासाठी ते या कारचा वापर करतात. त्यांची ही कार निळ्या रंगाची आहे. अॅलेक्स ऑर्चिन म्हणतात की, कारची खिल्ली उडवणाऱ्या लोकांसाठी त्यांची कार सर्वात किफायतशीर आहे. कार सुमारे 42 kmpl चा मायलेज देते.
कारची लांबी 134 सेमी, रुंदी 98 सेमी आणि उंची 100 सेमी आहे. कारला 3 चाके आहेत. ब्रिटनच्या Peel Engineering कंपनीने ही कार तयार केली आहे. यात 4.5 horsepower engine आहे. ही कार 1962 ते 1965 या काळात तयार करण्यात आली होती. नंतर 2010 मध्ये कार पुन्हा तयार करण्यात आली. या वन सीटर कारमध्ये सूटकेस ठेवायलाही जागा नाही. यामुळे,अॅलेक्स यांना स्टीयरिंगच्या एका बाजूला आपले पाऊल अॅडजेस्ट करावे लागतात. त्यांनी सांगितले की, जेरेमी क्लार्कसनला टॉप गियर शोमध्ये ही कार चालवताना पाहिले. त्यानंतर त्यांना ही कार खूप आवडली. गेल्या वर्षी त्यांनी या कारमधून संपूर्ण ब्रिटनचा दौरा केला होता. कारचा टॉप स्पीड फक्त 37 किमी/तास आहे.
अॅलेक्स म्हणाले, मला लहानपणापासून जुन्या, विंटेज आणि वेगळ्या दिसणाऱ्या कार आवडतात. मला विंटेज कार चालवायला आवडते. माझ्याकडे 1914 मॉडेल टी आणि 1968 ची मॉरिस मायनर कार देखील आहे. P50 कार मला तिच्या लहान आकारामुळे खूप आवडली. पण जेव्हा मी तिची मूळ किंमत पाहिली तेव्हा माझे होश उडाले. तिची किंमत 84 लाखांपेक्षा जास्त होती. नंतर मी माझ्या शहरातील एका व्यक्तीकडून सेकंड हँड कार विकत घेतली. याचबरोबर, ही कार नेहमीच लोकांना आकर्षित करते. जो कोणी पाहतो तो मला सांगतो की ती तुमच्यापेक्षा लहान आहे. मी कारच्या हँडब्रेकजवळ फक्त शॉपिंग बॅग ठेवू शकतो, असे अॅलेक्स यांनी सांगितले. दरम्यान, P50 कारचे उत्पादन 1960 मध्ये सुरू झाले होते. 2010 मध्ये, ती जगातील सर्वात लहान कार म्हणून घोषित करण्यात आली. या कारचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.