अमरावती (आंध्रप्रदेश) : पारंपरिक उर्जेद्वारे उच्च क्षमतेच्या उर्जा साठविणाऱ्या बॅटऱ्यांची निर्मिती आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज, सोमवारी बॅटरीचे अनावरण केले. थर्मल बॅटरी हे तंत्रज्ञान अशा प्रकारचे एकमेव असून, या तंत्रज्ञानाचे हक्क डॅा. पॅट्रिक ग्लीन यांनी 2016 मध्ये भारतात नोंद केले होते. या बॅटरीचे उत्पादन भारत एनर्जी स्टोरेज टेक्नॅालॅाजी (बेस्ट) कडून करण्यात येणार आहे. याद्वारे अक्षय्य उर्जेच्या स्त्रोतांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठविली जाणार आहे. ही संकल्पना संपत चाललेल्या उर्जेच्या स्त्रोतांवर उपाय ठरणार आहे. जगभरात सध्या अपारंपरिक जीवाश्म इंधनाचा वापर करून बॅटऱ्यांमध्ये उर्जा साठविण्यात येते. बेस्ट यासाठी 660 कोटी रुपये गुंतवणार असून याद्वारे तीन हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. बेस्टने सध्या उत्पादित केलेली बॅटरी 1 हजार मेगावॅाट एवढ्या क्षमतेची असून, पुढील पाच ते सहा वर्षांत ती 10 गीगावॅाट करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या बॅटरी दूरसंचार, वीजेवर चालणाऱ्या बसेसमध्ये वापरण्यात येणार आहेत. वातावरणातील उष्णता, घरे, कंपन्यांमधून निघणाऱ्या उष्णतेसह सुर्याच्या उष्णतेद्वारे ही बॅटरी चार्ज करता येणार आहे.
वाहनांची रेंज आठ पटींनी वाढणारबिल्वा मोटर्स या जागतिक स्तरावरील वाहन निर्मिती कंपनीकडून विजेवर चालणाऱ्या बसची निर्मिती करण्यात येणार आहे. बेस्टच्या थर्मल बॅटरीमुळे या गाड्यांची वाहतूक क्षमता एका चार्जिंगला 800 किमी होणार आहे. सध्या देशातील विजेवर चालणाऱ्या छोट्या वाहनांची क्षमता जेमतेम 100 किमीच्या आसपास आहे. बेस्टचा हा प्रकल्प मे 2019 पासून कार्यन्वित होणार आहे.