स्मार्टफोन्सप्रमाणे आता कारही अॅडव्हान्स झाल्या आहेत. आजकाल प्रत्येक कारमध्ये तुम्हाला स्मार्टफोनसारखे फीचर्स मिळतात. अशातच या दोन इंडस्ट्री एकत्र येतानाही दिसत आहेत. एकीकडे ऑटोमोबाईल क्षेत्रातील Nio आणि Geely सारख्या कंपन्या स्मार्टफोन क्षेत्रात येत आहेत, तर दुसरीकडे स्मार्टफोन क्षेत्रातील दिग्गज Xiaomi इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये एंट्री करण्यास सज्ज झाली आहे.
लवकरच Xiaomi ची इलेक्ट्रिक सेडान बाजारात येणार असून, या कारचे काही फोटो लीक झाले आहेत. MS11 असे या EV कारचे नाव असून, इंटरनेटवर याचे फोटो लीक झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, 2024 च्या पहिल्या तिमाहीत ही कार बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. सुरुवातीला ही कार चीनी मार्केटमध्ये येईल, नंतर इत देशांमध्ये लॉन्च केली जाईल.
Xiaomi MS11 इलेक्ट्रिक सेडान कारचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. 2010 मध्ये Xiaomi ने स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात एंट्री घेतली होती. हळुहळू कंपनीने टीव्हीपासून स्मार्ट स्पीकर, रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर, किचन अप्लाइंसेजसारख्या क्षेत्रातही जम बसवला. आता कंपनी इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये एंट्री घेण्यास सज्ज झाली आहे.
Xiaomi ऑटोमोबाइलची स्थापना 2021 मध्ये झाली असून, याचे हेड ऑफीस बीजिंग इकोनॉमिक अँड टेक्नोलॉजिक डेव्हलपमेंट झोन (BETDA) मध्ये आहे. सुरुवातीला या फॅक्टरीमध्ये वर्षाला 1.5 लाख गाड्यांचे उत्पादन केले जाईल, नंतर याला वाढवून 3 लाख यूनिट्स केले जाणार आहे. कंपनीने Xiaomi Automobile Technology नावाने अजून एक कंपनी उभारली आहे. ही कंपनी ऑटोनॉमस ड्रायव्हिंग टेक्नोलॉजीवर काम करत आहे.