इलेक्ट्रीक स्कूटरची मागणी भारतातच नाही तर जगभरातील देशांमध्येही आहे. यामहा मोटर्सने देखील नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. २०१९ मध्ये कंपनीने या स्कूटरवरून पडदा हटविला होता. तैवानची कंपनी गोगोरोसोबत मिळून यामहाने ही नवीन स्कूटर डेव्हलप केली आहे. खतरनाक लूकसोबत स्वॅपेबल बॅटरी देण्यात आली आहे. तैवानमध्ये ही स्कूटर पहिल्यांदा विकली जाणार आहे.
भारतात पुढील काही महिन्यांत यामहा पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार आहे. त्या आधीच तैवानमध्ये एक स्कूटर लाँच करण्यात आली आहे. या स्कूटरची भारतीय चलनातील किंमत जवळपास 2.77 लाख रुपये आहे. यामहा ईएमएफ इलेक्ट्रीक स्कूटर ही खूप वेगळ्या डिझाईनची स्कुटर आहे. मॉडर्न स्टाईलसोबत ताकदवरही दिसत आहे.
भारतात यामहाच्या दुचाकींना मोठी मागणी आहे. एफझेड सारख्या मोटरसायकलना अधिक पसंती आहे. परंतू स्कूटर श्रेणीमध्ये यामहाला तेवढे यश मिळालेले नाही. यामुळे इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये यामहाला किती यश मिळते ते स्कूटरच्या रेंजवरच अवलंबून असणार आहे. Yamaha EMF ला डार्क ब्लॅक, डार्क ग्रीन आणि लाइट ब्लू कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. ड्युअल एलईडी हेडलँप, ट्रेंडी रिअर व्ह्यू मिरर, डिजिटल इन्स्ट्रूमेंट कंसोल, सिंगल पीस सीट, डुअल एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत.
फिचर्समध्ये एनएफसी कार्ड कंट्रोल ऑन-ऑफ, लास्ट पार्किंग लोकेशन, टर्न-बाई-टर्न नेविगेशन आदी देण्यात आले आहे. या स्कूटरमध्ये मिड-माऊंटेड इलेक्ट्रीक मोटर देण्यात आली आहे, जी १०.३ पीएसची ताकद आणि २६ एनएम टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर ३.५ सेकंदांत 0-50 kmph चा वेग पकडते. यामहाने अद्याप बॅटरी रेंजबाबत सांगितलेले नाही.