रियाद : सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी साऱ्या जगाला गंभीर इशारा दिला आहे. यामुळे जर कच्च्या तेलाचे दर वाढले तर सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे. देशातील पेट्रोल डिझेलचे दर वर्षातील उच्चांकावर आहेत.
सप्टेंबरच्या सुरुवातीला सौदीच्या सरकारी रिफायनरीवर ड्रोन, मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला होता. यानंतर अमेरिकेने हा हल्ला ईरानने केल्याचा आरोप केला होता. तर या हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या हुती विद्रोहींनी घेतली होती. तर सौदीनेही या हल्ल्यामागे ईरान असल्याचे म्हटले होते. सलमान यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर वक्तव्य केले आहे.
ईरानमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा बाधित होणार असून तेलाच्या किंमती एवढ्या वाढतील की या किंमती आम्ही आयुष्यात पाहिल्या नसतील, असा गंभीर इशारा सलमान यांनी दिला. यासाठी ईरान जबाबदार असणार आहे. या देशाविरोधात जगाने एकत्र आले पाहिजे, अन्यथा या किंमतींचा विचार करणेही कठीण जाईल, अशी धमकीच त्यांनी जगाला दिली आहे. सौदीच्या तेलाच्या रिफायनरींवर हल्ला करण्यात ईरानचा हात होता हे दाखविण्यासाठी सौदीमध्ये शस्त्रांचे एक प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये दावा करण्यात आला की, एवढी अद्ययावत हत्यारे हुती विद्रोही चालवू शकत नाहीत. मात्र, ईरान या हल्ल्यांमागे हात असल्याचे नाकारत आहे.
अमेरिकी चॅनेल सीबीएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान यांनी सांगितले की, सौदी अरेबियातील तेलाच्या रिफायनरीवर हल्ला ही ईरानकडून युद्धाची सुरूवात होती. यानंतरही आम्ही ईरान वादावर सैन्य नाही तर राजनैतिक तोडगा काढण्याचा विचार करत आहोत. कारण युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल. सलमान यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईरानचे राष्ट्रपती हसन रुहानी यांना भेटून अणू कराराबाबत चर्चा करायला हवी. जेणेकरून ईरानच्या प्रभावाला मध्यपूर्वेतच रोखता येईल. यावेळी सलमान यांना पत्रकार जमाल खशोगी यांना मारण्याच्या आदेशाबाबतही विचारण्याच आले. यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. मात्र, त्यांनी खशोगी यांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी घेत असल्याचेही सांगितले. कारण त्यांच्या हत्येमागे सौदी सरकारचेच काही लोक होते. ही एक चूकच होती आणि भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.