हो चि मिन्ह सिटी : आशियाई ज्युनिअर चॅम्पियन लक्ष्य सेनने मंगळवारपासून सुरु होत असलेल्या व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली. यामुळे भारताची एकेरी पुरुष गटात अजय जयरामवर मदार असेल. पायाला झालेल्या दुखापतीमुळे लक्ष्यने माघार घेण्याचा निर्णय घेतला.लक्ष्यचे मेंटर आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक विमल कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘पायामध्ये अजूनही असलेल्या वेदनेमुळे लक्ष्यने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या दोन्ही पायांना जखम झाली होती व त्यामुळेच आशियाई ज्यूनिअर स्पर्धेनंतरही त्याला सरावादरम्यान वेदना होत होत्या. फिजिओ हीथ मॅथ्यूज यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्यवर उपचार सुरु आहेत. यासाठीच तो मुंबईला गेला असून त्याची एमआरआय होईल.’ १६ वर्षीय लक्ष्यने गेल्या महिन्यात आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिप जेतेपद जिंकले होते. गेल्या ५३ वर्षांत या गटात सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला होता.>रशियन ओपनच्या उपांत्यफेरीपर्यंत मजल मारणाऱ्या मिथुन मंजुनाथला क्वालिफायरसोबत लढत द्यावी लागेल. अभिषेक येलिगार मॉरिशसच्या जॉर्जेस ज्युलियेन पालसोबत खेळेल तर श्रेयांश जायस्वालची लढत पात्रता फेरीचा अडथळा पार करणाºया खेळाडूविरुद्ध होईल. राहुल यादवला तियेन मिन्ह एंगुयेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. महिला एकेरीत रुत्विका गाडेची लढत मलेशियाच्या यिन फुन लिमविरुद्ध होईल. मुग्धा आग्रे सातव्या मानांकीत चीनच्या हान युईविरुद्ध खेळेल. वैदेही चौधरीची गाठ अमेरिकेच्या क्रिस्टल पानसोबत पडेल. रसिका राजे क्लालिफायरविरुद्ध भिडेल.
लक्ष्य सेनची दुखापतीमुळे माघार, भारताची मदार अजय जयरामवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 4:04 AM