हैदराबाद : ‘आशियाई स्पर्धेची तयारी करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटूंना पुरेसा वेळ मिळालेला नाही. असे असले तरी इंडोनेशियात १८ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत पदक जिंकण्यास आम्ही सज्ज आहोत,’ असे स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने म्हटले आहे.भारतीय बॅडमिंटन संघाने चार वर्षांआधी इंचियोन येथे केवळ एक कांस्य जिंकले होते. पण यंदा पदकांचा रंग बदलेल, असे सिंधूला वाटते. रविवारी विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्वत:चे दुसरे रौप्य आणि एकूण चौथे पदक जिंकणारी सिंधू म्हणाली,‘आम्हाला सांघिक व्यतिरिक्त वैयक्तिक स्पर्धांमध्ये खेळायचे असल्याने पदकांचा रंग बदलेल. तयारीसाठी वेळ कमी असला तरी उत्कृष्ट निकाल येतील अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.’वैयक्तिकरीत्या माझी कामगिरी चांगली होईल, अशी अपेक्षा आहे. विश्व चॅम्पियनशिपच्या रौप्यपदकामुळे आत्मविश्वास वाढला आहे. भारताने आशियाईच्या महिला एकेरीत अद्याप पदक जिंकलेले नाही. १९९२ च्या दिल्ली आशियाडमध्ये सय्यद मोदी यांनी एकमेव वैयक्तिक पदक जिंकले होते. यंदा महिलांमध्ये सिंधू पदकाची दावेदार असल्याचे मत राष्टÑीय कोच गोपीचंद यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. गोपीचंद म्हणाले, ‘सिंधूकडून आगामी दहा दिवसानंतर महिला गटात आशियाईचे पदक जिंकण्याची अपेक्षा बाळगली जाऊ शकते.’विश्व स्पर्धेत अन्य भारतीय खेळाडूंबाबत गोपीचंद म्हणाले, ‘या स्पर्धेत आमचे चार खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले हे आतापर्यंतची मोठे यश आहे. तरीही अजून सुधारणा करण्याची गरज आहे. प्रणय व किदाम्बी श्रीकांत आणखी चांगली कामगिरी करू शकले असते.’>विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकून मी फार आनंदी आहे. हा आठवडा चांगला राहिला. मला कठीण ड्रॉ मिळाला होता. पहिल्या फेरीपासूनच अटीतटीचे सामने झाले. माझ्याकडून मी शंभर टक्के योगदान दिले. सुवर्ण पदकासाठी मात्र मला कठोर मेहनत घ्यावी लागेल. एक दिवस सुवर्ण पदक नक्कीच मिळेल.- पी. व्ही सिंधू.
आशियाईच्या तयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 4:11 AM