मुंबई- जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावर पदक पटकावण्याचा भार आला आहे. पुरुष एकेरीत श्रीकांत किदम्बीचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते महिला एकेरीच्या सामन्यांकडे. ज्यात सायना व सिंधू या दोघी भारतीयांचे अपेक्षांचे ओझे वाहत आहेत. पण सध्याचा फॉर्म पाहता सिंधू भारताला यंदा सुवर्णपदक नक्की जिंकून देइल असा विश्वास आहे.
भारताला मागील 14 आशियाई स्पर्धेत एकदाही कांस्यपदकाची वेस ओलांडता आलेली नाही. 2014च्या इंचाँन आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना केवळ एकाच ( कांस्य) पदकावर समाधान मानावे लागले होते. पण त्यानंतरच्या चार वर्षांत विशेषतः चीन, जपान, कोरिया यांचे वर्चस्व असलेल्या बहुतांश स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपले नाणे खणखणीत वाजवले. सिंधू त्यात आघाडीवर आहे.
ऑलिम्पिकमधील रौप्यपदक आणि जागतिक स्पर्धेतील चार पदकं ( दोन रौप्य व दोन कांस्य) ही त्याचीच साक्ष देतात. त्यामुळे कोर्टवरील तिची कट्टर वैरी कॅरोलिना मारिन हीनेही यंदा सिंधू सुवर्णपदक जिंकेलच असा विश्वास व्यक्त केला आहे. काय म्हणाली मारिन, पाहा हा व्हिडिओ..