जकार्ता : आॅलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी आज येथे आशियाई चॅम्पियनशिपमध्ये बॅडमिंटन महिला एकेरी गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यासोबतच भारतासाठी आणखी दोन पदके निश्चित झाले.लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना हिने विश्व रँकिंगमधील पाचव्या क्रमांकाची थायलंडची खेळाडू रतचानोक इंतानोन विरोधात पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यावर शानदार पुनरागमन केले. आणि २१-१८,२१-१६ असा विजय मिळवला. त्यासोबतच ३६ वर्षांनी भारताचा पदकांचा दुष्काळ संपवला. उपांत्य फेरीचा हा सामना ४२ मिनिटे चालला.
आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेती खेळाडू सिंधू हिने थायलंडची अन्य खेळाडू जिदापोल नितचाओनला २१-११,१६-२१,२१-१४ असे पराभूत करत पदक निश्चित केले. आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीतील भारताचे हे पहिले पदक आहे. सैयद मोदी हे आशियाई स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवणारे पहिले खेळाडू आहे. त्यांनी १९८२ मध्ये पुरुष एकेरीत कांस्यपदक मिळवले होते. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना विश्व रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुची हिच्यासोबत होईल, तर सायनाची लढत विश्व रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या चिनी तायपेच्या ताय जु यिंगसोबत होईल.आमच्यासाठी हे शानदार आहे; मात्र अजून पदकाची भूक वाढली आहे. मी विचार करत आहे हे सुवर्णपदक असेल. भारताच्या दोन्ही खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा अंतिम फेरीतील लढत रंगेल का, यावर सिंधू म्हणाली की, हे भारतीय बॅडमिंटनसाठी शानदार असेल. अंतिम फेरीत दोन खेळाडू भारतीय असतील. -पी. व्ही. सिंधू
ती मजबुतीने खेळली. मला माहीत होते की ती आज कडवे आव्हान देईल. मी गंभीरतेने तिला घेतले. सुरुवातीला माझ्या हालचाली योग्य नव्हत्या; मात्र १२-३ ने स्कोअर केल्यानंतर, मी चांगला खेळ करायला सुरुवात केली. - सायना नेहवाल