नवी दिल्ली : स्टार पी. व्ही. सिंधूला विश्वविजेतेपदात मार्गदर्शन करणारी भारतीय महिला एकेरी संघाची बॅडमिंटन प्रशिक्षक किम जी ह्यून हिने वैयक्तिक कारणामुळे मंगळवारी राजीनामा दिला. टोकियो आॅलिम्पिकला वर्षभराहून कमी कालावधी शिल्लक असल्याने भारताला लवकरच किमचा पर्याय शोधावा लागेल. बुसान येथे वास्तव्य करणाऱ्या ४५ वर्षीय किमला पती रिची मेरच्या उपचारासाठी न्यूझीलंडला जावे लागेल. काही दिवसांआधी रिचीला ‘मस्तिष्काघात’ झाला होता. भारतीय बॅडमिंटन संघटनेने याचवर्षी किमसोबत करार केला होता. तिच्या मार्गदर्शनात सिंधूने जागतिक स्पर्धेचे सुवर्ण जिंकले.मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद म्हणाले, ‘किमने राजीनामा दिला, हे खरे आहे. तिचा पती आजारी आहे. आम्ही विश्व अजिंक्यपद स्पर्धेमध्ये असताना त्याला मस्तिष्काघात झाल्याचे कळताच किम परतली होती. पतीचा आजार बरा होण्यास चार ते सहा महिने लागू शकतात.’ सिंधू म्हणाली,‘आता माझ्याकडे किमच्या अनुपस्थितीत पुढचा विचार करण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. किमला जावे लागले हे दुर्दैवी आहे. तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करते. किमसोबत माझे सलोख्याचे संबंध होते. आता नव्याने सुरुवात करावी लागेल. खेळाडूच्या आयुष्याचा हा भाग आहे. गोपी सरांच्या मार्गदर्शनात कठोर मेहनत करावीच लागेल.’ (वृत्तसंस्था)
बॅडमिंटन प्रशिक्षक किमचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 1:40 AM